08/03/2026
मी आहे शलाका शिंपी. चार चौघिंसारखी एक स्त्री, आई, बायको, मुलगी, मैत्रीण, बहीण!! एवढंच काय, की पेशानी आहे मी एक डॉक्टर. Obstetrician - Gynaecologist. थोडक्यात सांगायचं तर स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ. गेले तीस वर्ष पुण्यात प्रॅक्टिस करते आहे.
आठवी नऊवित असताना माझ्या आजोबांना माझ्या डोळ्यांदेखत जाताना बघितलं. आणि त्या दिवशी ठरवलं. मी डॉक्टर होणार!!
शिक्षण - पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर अनुभव मिळवण्यासाठी बऱ्याच शहरांमध्ये हिंडले. सरकारी, निमसरकारी, प्रायव्हेट हॉस्पिटल्स मध्ये राब राब राबले - टक्के टोणपे खाल्ले - ३६ तास ४८ तास सलग ड्यूट्या केल्या... मेडिकल कॉलेज मधल्या अभ्यासाची सवय होतीच, पण "अडल्या नडलेल्यांना उपयोगी पडण्याची दुर्दम्य इच्छा" - यामुळे कधी कामाचा जाच नाही झाला.
स्वतः च घर संसार, मुलं- बाळं, आला गेला, पै पाहुणा सांभाळून स्वतः च क्लिनिक चालवताना तारांबळ उडते खरी. पण करू त्या कामात आनंद मानला की जाच होत नाही.
त्रास होतो तेंव्हा निसर्गाकडे बघते. मुंग्यांची रांग दिसते. अविरत कष्ट करणारी - समोरून कुणी आली की थांबून क्षणभर सुख दुःखाच्या चार गोष्टी करणारी, आणि पुन्हा सुरू होणारी.
थोडक्यात काय, तर भरपूर कष्ट करा, करू त्या कामात आनंद घ्या, पूर्ण ताकदीनी तर कराच पण हौसेने करा. चार क्षण आनंदाचे कमवा, आणि तो आनंद वाटा.. पसरवा. आपल्या परीनं समोर आलेल्या व्यक्तीचं जीवन समृद्ध करा!
त्यातच माणसाचं "माणूसपण" दडलेलं आहे.