03/08/2025
काळ आला होता पण…
सकाळची नियमित rounds ची वेळ. अर्धा round होत आलेला. एक पेशंट इथे तर एक तिथे, रोजची वारीच म्हणा ना. आज इकडून पेशंट बघायला सुरवात करायची तर उद्या तिथून, तेवढाच काय तो बदल.
‘Triaging’ हा मेडिकल प्रॅक्टिस मधला एक अविभाज्य व महत्वाचा भाग आहे. आलेल्या १० पेशंट पैकी पहिले प्राधान्य कोणाला द्यायचे हे त्याच्या प्राथमिक तपासणी वरून ठरवले जाते. Casualty मध्ये तर याला अनन्यसाधारण महत्व आहे. हुशार resident वॉर्ड मध्ये देखील या तत्वांचा वापर करून स्वतःचे काम पुष्कळ हलके करू शकतो. प्रत्येक पेशंट ला लागणारा वेळ आणि कौशल्य एक सारखे नसते. काही केसेस अत्यंत क्लिष्ट तर काही त्या मानाने सरळसोट. किरकोळ ऑपरेशन झालेले इतर व्याधी नसलेले पेशंट हे त्या मानाने सरळसोट केसेस असतात. त्यांच्यात गुंतागुंत होण्याची शक्यता कमी असते.
नवीन इमारतीमधील राऊंड झाली, आता आधी वरच्या मजल्यावर जावे का खालून सुरू करावे? आज आधी खाली जाऊ या.
अनुभवाने तयार झालेला रेसिडेंट चालता-चालताच पेशंट ची माहिती देऊ लागला. उत्तमरित्या सांगितलेली माहिती ही चल चित्रपटासारखी असते. त्यातून पेशंटच्या प्रकृतीचा सगळा कच्चा चिठ्ठा पटकन लक्षात येतो. सगळ्या माहितीतून महत्वाची माहिती निवडणे आणि ती अधोरेखित करणे हे कौशल्य अनुभवाने प्राप्त होते.
पेशंटच्या bed शी पोहोचताच अनेक धोक्याचा घंटा मनात वाजू लागल्या. एका कटाक्षात अनेक गोष्टी normal च्या मापदंडात बसत नसल्याचे लक्षात आले. पेशंट अत्यंत अस्वस्थ होता. २ दिवसांपूर्वी तोंडाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झालेली. टाके अजून तसेच होते. ऑपरेशन नंतर साहजिकरित्या आलेली तोंडावरची सूज. श्वास घेता यावा म्हणून माने मध्ये एक छोटे छिद्र करून त्यातून पाईप द्वारे श्वास घेण्याची केलेली सोय (tracheostomy). या सर्व कारणांमुळे पेशंट ला बोलता येणे शक्य नव्हते. ‘नर्स ताबडतोप pulse ox घ्या’ मी गरजलो. Pulse ox म्हणजे रक्तातील ऑक्सीजन चे प्रमाण मोजण्याचे साधन. एकीकडे ऑक्सीजन मास्क लावायचे काम माझ्या हातांनी नकळतच चालू केले होते. ‘किती वेळ झाला त्रास होतोय‘ मी नातेवाईकाला विचारले. ‘ हे काय सर, दोन मिनिटे पण नाही झाली!’
पेशंट ची ऑक्सीजन लेवल screen वर झळकली - ४०!
‘ सिस्टर suction T piece stat!‘ पूर्ण वॉर्ड तडक कामाला लागला.
माणसाच्या शरीरात अनेक स्राव निर्माण होतात व सामान्यरित्या त्याचा निचरा होत असतो. ऑपरेशन झालेल्या पेशंट मध्ये अनेकदा हे स्राव वाढतात व निचऱ्याला अडथळा झाल्यास ते साठतात. या पेशंट च्या बाबतीत नेमके हेच झाले होते. स्राव श्वासनलिकेत साठल्याने पेशंट चा श्वास गुदमरत होता. तिला ते सांगता देखील येत नव्हते.
Spo2-20. ‘Sister activate code blue!’ पुढच्या काही सेकंदात पेशंट बेशुद्ध होणार होता आणि तसेच झाले. ‘Doctor keep your fingers on the carotid’, मी रेसिडेंट ला उद्देशून म्हणालो. हृदय बंद पडायला लागल्यास लगेचच CPR चालू करावे लागणार होते. काही सेकंदातच code blue team तिथे पोचली. एव्हाना आम्ही suction करून श्वासनलिकेतील साठलेले द्रव यशस्वीरित्या बाहेर काढले होते.
Spo2 80. ऑक्सीजन सुधारला होता. मी सुटकेचा निश्वास सोडला. ‘Check for sensorium’, पेशंट ची शुद्ध तपास असे मी रेसिडेंट ला सांगितले. ‘ मावशी, बरं वाटतय का?’ पेशंट चा खांदा हलवत तो मोठ्याने ओरडला. पेशंट ने डोळ्यानीच ‘हो’ असे उत्तर दिले. एव्हाना code blue team ने T piece जोडून ऑक्सीजन full flow ने चालू केला होता. पेशंटची प्रकृती स्थिरावली आणि मोठा अनर्थ टळला. सर्वांचे हृदयाचे वाढलेले ठोके हळू हळू स्थिरावले. पेशंट आणि डॉक्टर दोघेही भानावर आले. पेशंट code blue team च्या हवाली करून आम्ही पुढच्या round ला निघालो.
घरी आल्यावर घडलेली घटना पुन्हा मनात फिरु लागली. त्या वॉर्ड ऐवजी मी आधी दुसऱ्या वॉर्ड ला गेलो असतो तर ?
एखादा जीव वाचण्यामागे किती फासे बरोबर पडावे लागतात. केवळ नियती मुळे मी तिथे वेळेवर पोचणे. अनुभवाने तत्क्षणी अचूक निदान करु शकणे. साथीला उत्तम trained टीम असणे. या पैकी एक जरी गोष्ट नसती तर आज चित्र वेगळे असते.
एकूण घडलेल्या प्रकारात काय तर काळ आला होता पण…
-डॉ निखील साठये ©️