24/09/2024
पितृपक्ष आणि पंचकोश.
गेले आठवडाभर आपण पितृपक्षाच्या निमित्ताने विविध प्रकारचे धार्मिक विधी करतो आहोत. आपले पितर उर्फ पूर्वज खरेतर आपल्याच शरिरात रहात असतात. आपले आई आणि वडील दोघेही समसमान गुणसुत्रांद्वारे (Chromosomes) आपल्याच शरिरात वास करत असतात. ह्यालाच आपण वांशिक स्मृती ( Genetic Memory) म्हणतो. लहानपणी बाळांचे फार कौतुक होते, आई वर पडलाय, वडीलांसारखा दिसतो. पण खरी गंमत चाळीशी नंतर चालू होते. आपले हावभाव, लकबी तंतोतंत व्हायला लागतात. इतकेच नव्हे तर त्यांचे आजार सुद्धा डोके वर काढयला लागतात. वडिलांना डायबिटीस होता, मला पण रक्तात साखर निघाली.
काही वेळा वांशिक आजारांची अनाहूत भिंती देखील भेडसावत राहते. आईला गर्भाशयाचा कर्करोग होता, मला तर होणार नाही ना?
अशा अनेक शंका मनाला बोचत असतात. त्यांच्या आठवणींनी मन भरून येते, त्याच बरोबर आपण पण त्यांच्या श्रेणीत दाखल झालो, ही हुरहूर मनात दाटून येते.
ख-या अर्थाने पितृ पंधरवडा म्हणजे आपल्या पूर्वजांच्या सत्कर्मांचे स्मरण करणे. जे जे मिळाले त्याबद्दल आभार मानले. खुल्या हृदयाने मर्यादा स्वीकारणे. त्यांच्या विषयी कृतज्ञ भाव ठेवून आनंदी राहणे. ह्याने तुमचे पंचकोश आनंदाने ओथंबून व्हायला लागतात. तुम्हाला आनंदात बघून तुमचे पूर्वज, आई, वडील, आजी, आजोबा खुष नाही का होणार ? आनंदात फक्त आरोग्य राहते, याच साठी कदाचित पितृपंधरवड्याची संकल्पना रुजू केली असावी.
आपल्या पितरांची मनापासून माफी मागा, कळत नकळत आपण त्यांना खूप दुखावलेले असते, त्यांच्या समृद्ध वारश्या बद्दल मनापासून त्यांचे आभार माना. त्यांना कोटी कोटी प्रणाम करा, कोटी कोटी धन्यवाद द्या.
आणि बघा तुमच्या आयुष्यात काय जादू घडतेय.
कल्याणमस्तु!!