19/10/2017
दातांचे सौन्दर्य
लेखक:
वैद्य. नीलेश गजानन कुलकर्णी;
एम्.डी. (आयुर्वेद), एम्.ए. (संस्कृत)
संजीवन आयुर्वेद क्लिनिक
फ्लॅट क्र. ८,पहिला मजला, मेधावी सोसायटी,
हॉटेल मिर्च मसाला जवळ, कोथरुड, पुणे - 411 038
भ्रमणध्वनी: +91 - 8805 33 55 12
ईमेल: vd.nilesh@gmail.com
आपण ज्या व्यक्तीला सुंदर समजतो, अशा कोणत्याही व्यक्तीची दात नसलेल्या किंवा पडलेल्या अवस्थेत कल्पना करुन पहा बरं! अवघड आहे ना? दात नसल्यामुळे ती व्यक्ती आपणास अगदीच कुरुप वाटू लागते. आले ना लक्षात दातांचे महत्त्व? आपल्या सौंदर्याच्या कल्पनांमध्ये आपण केस, त्वचा, ओठ, डोळे अशा सगळ्या अवयवांना विचारात घेतो; पण दातांना? नाही; दातांचा तेवढा विचार, सौंदर्याच्या दृष्टीनं आपण करीत नाही. नाहीतरी, दात दिसतात कुठे? ते फक्त हसताना दिसतात. आणि हो! खरे तर ओठांनी पूर्णपणे झाकले जाणारे दातच उत्तम, असे शास्त्रात स्पष्ट सांगितले आहे; मग कशाला, उगीच लोकांना दात दाखवीत हिंडावे!? असो! तर मुद्दा असा की, सौंदर्याच्या कल्पनांमध्ये दातांचेही अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वेडेवाकडे आलेले दात कोणाला हवे असतात? किंवा काळपट आलेला दात हाही सौंदर्याची हानीच करतो.
या लेखामध्ये आपण आयुर्वेद शास्त्रानुसार दातांचे सौंदर्य म्हणजे आरोग्य कसे टिकवावे – वाढवावे, याची चर्चा करणार आहोत. होय! सौन्दर्य म्हणजे केवळ मुलामा देवून आणलेले देखणेपण नव्हे, तर उत्तम आरोग्य हे खरे सौंदर्याचे लक्षण आहे, हे आपण सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. जे निरोगी, ते सुंदर !
आता वाचकांना असा प्रश्न पडला असेल की आयुर्वेदाचा आणि दातांचा संबंध काय? आपल्या प्राचीन वैद्यक शास्त्रात म्हणजे आयुर्वेदात दात आणि दातांच्या विकारांबद्दल सखोलपणे विश्लेषण केलेले आहे. पुढील विस्तारावरुन आपल्याला त्याची कल्पना येईलच.
बालकांमधील दात येण्याबद्दल -
आयुर्वेदाच्या काश्यपसंहितेमध्ये ज्यात बालकांच्या विकारांचे वर्णन केले आहे, त्यात बालकांमध्ये होणाऱ्या दन्त-उत्पत्तिबद्दल सविस्तर वर्णन सापडते. आपणा सर्वांना माहिती आहे त्याप्रमाणे मनुष्यात पूर्ण वाढ होईपर्यंत मुखामध्ये एकूण ३२ दात उत्पन्न होतात. सर्वप्रथम खालचे दात येतात, ते ५ व्या ते १० व्या महिन्यात! बालकात प्रथम खालचे दात येणेच अपेक्षित आहे. वरचे दात प्रथम आले तर ती विकृती आहे. ३२ दातांपैकी ८ दात हे एकदाच येतात, म्हणजे पडून पुनः येत नाहीत. उरलेले २४ दात हे पडून पुनः येतात. या दातांना “दोनदा येणारे” म्हणून संस्कृत भाषेत “द्विज” असे म्हणतात.
साधारणपणे काही नियम असे आहेत: १. ज्या महिन्यात बालकाला दात येवू लागतात, तेवढ्याच दिवसात ते हिरड्यातून पूर्णपणे बाहेर येतात. उदा. जर ५ व्या महिन्यात दात येवू लागला तर तो पाच दिवसात पूर्णपणे हिरड्यातून बाहेर येतो. २. ज्या महिन्यात दात येवू लागतात, त्या वर्षात दुधाचे दात पडून नवीन दात येतात. उदा. जर ६ व्या महिन्यात दात येवू लागले तर ६ व्या वर्षात दुधाचे दात पडून पुनः नवीन दात येतात. बालकाच्या उत्तम आरोग्याचे लक्षण म्हणजे जन्मानंतर ८ व्या महिन्यात पहिले दात यावेत ! बालकांमध्ये येणाऱ्या दातांना दुधाचे दात milk teeth असे म्हणतात, कारण ते आईच्या दुधाने पुष्ट झालेले असतात. साधारणपणे अडीच वर्षात बालकाचे सगळे दुधाचे दात आलेले असतात. हे दुधाचे दात संख्येने २० असतात. २ मधले दात (central incisors), ४ बस्त (Lateral incisors), ४ हानव्य (canine / eye teeth) असे वरचे १० आणि खालचे १० असे हे २० दात येतात.
अशा प्रकारे, बाल्यावस्थेत आणि किशोरावस्थेत दोन वेळा मनुष्यात दात येतात. किशोरावस्थेत येणारे दात हे स्थिर असतात. ते उतारवयात पडतात, त्यानंतर मात्र पुनः येत नाहीत.
दात कसे असावेत? हे सामान्यतः अनुवंशानुसार ठरते. एखाद्या कुटुंबातील माणसांच्या दातांची रचना निसर्गतःच ठरलेली असते. जन्मतःच दात असणे, एखादा दात काळपट असणे, दात एकमेकांपासून विलग म्हणजे विरळ असणे, दातावर दुसरा दात येणे, दात वेडेवाकडे येणे, एखादा दात न येणे; या सगळ्या जन्मजात विकृती आहेत.
बालकाला दात येताना होणारे आजार याबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. दात येते वेळी बालकाला काहीही झाले तरी दात येण्यामुळेच ते होत आहे; असा निश्चित समज करुन घेतला जातो. परंतु, नेहमीच दात येणे हेच एखाद्या आजाराचे कारण असेल असे नाही. या काळात मुले चिडचिडी झालेली असतात. ताप येणे, उलट्या होणे, जुलाब होणे, खोकला अशी काही सामान्य लक्षणे यावेळी दिसतात. कोणतेही लक्षणाची आपल्या डॉक्टरांकडून तपासणी करुन घेवूनच ते लक्षण दात येण्याशी संबंधित आहे किंवा नाही?, हे ठरवावे.
दात येताना हिरड्या शिवशिवत असल्यामुळे मुले दिसेल ती वस्तु तोंडात घेवून चावतात. यामुळे जीवजन्तु पोटात जावूनही हे विकार होतात; त्यामुळे या काळात स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यायला हवे. हल्ली हिरड्यांवर इजा न करणारी परंतु मऊ अशी तोंडात धरुन बाळाला सहजपणे चावता येतील अशी रबर / प्लॅस्टिकची खेळणी बाजारात उपलब्ध आहेत. स्वच्छता पाळून या खेळण्यांचा वापर करता येईल.
Bottle teeth syndrome नावाचा एक प्रकार हल्ली दिसतो. म्हणजे, जी मुले बाटलीने दूध पितात, अशा मुलांमध्ये दूध पिवून झाल्यानंतर बाटली वेळीच काढून न घेतल्यामुळे किंवा त्यानंतर पाणी न पाजल्याने दुधाचा अंश तसाच तोंडात राहून दात किडतात. यासाठी आयांनी बाटलीने दूध पाजत असाल तर काळजी घ्यायला हवी.
दाताबद्दल आयुर्वेदाचे मत –
दाताची रचना आपल्या वडिलांच्या दातांवरुन सामान्यतः ठरते. वडिलांचे दात बळकट असतील, तर त्या संततीचे दातही बळकट असण्याची शक्यता वाढते. ज्यांच्या शरीरात मेदाची अतिरिक्त वाढ झालेली नाही, स्निग्धता उत्तम प्रमाणात आहे, त्यांचे दात तुकतुकीत आणि बलवान् असतात. दातावर दात येणे, दात फुटणे, दाताचा शुभ्र वर्ण जावून इतर कोणताही रंग येणे; या विकृती आहेत. दात खाणे, दातावर दात आपटणे यामुळे दातांवर विपरीत परिणाम होतो. दाताने वस्तु तोडणे, असे आततायी प्रकार केल्यानेही दाताचे तुकडे पडणे किंवा दुखणे असे प्रकार होतात. लहान मुलांनी पालथे झोपणे, झोपताना तोंड उघडे रहाणे, दात न घासणे; ही दात अयोग्य पद्धतीने येण्यामागील महत्त्वाची कारणे आहेत. मोठ्या माणसांमध्ये तंबाखू इ. सारखी व्यसने, सतत तोंड गलिच्छ रहाणे, यामुळेही दाताचे विकार होतात. (झोपताना तोंड उघडे रहात असेल तर त्याचे कारण शोधून वेगळी उपाययोजना केली पाहिजे.) अति आंबट खाण्याने दात आंबतात, अम्लपित्त होवून दात आंबट न खाताही आंबलेले रहातात; तर अति मीठ / खारट खाण्याने दाताची मुळे ढिली होवून लवकर दात पडतात. म्हणून या दोनही चवींचा वापर आहारात माफक आवश्यक एवढाच करावा.
दात घासण्याबद्दल –
आपल्यावर सध्या जाहिरातींमधून इतका भडिमार केला जातोय की खरे काय आणि खोटे काय? हेच सामान्य माणसाला कळत नाही. मला आठवते, आपल्याकडे होळी झाल्यानंतर दात घासण्यासाठी “घरगुती राखुंडी” करण्याचा एक कार्यक्रम होत असे. होळीच्या दुसऱ्या दिवशी राख बारीक करुन चाळून घेवून त्यात काही आयुर्वेदिक औषधे मिसळून राखुंडी केली जात असे. ही राखुंडी वर्षभर पुरत असे. चवदार आणि दात स्वच्छ करणारी राखुंडी ही कल्पनाच आताच्या पिढीला नसेल ! आम्ही हौसेने ही राख वस्त्रगाळ करुन घेत असू !
पण राखेमुळे दातांवर ओरखडे उठतील असा प्रचार करीत कित्येक टूथपेस्ट आपल्या घरात घुसल्या आणि “आपके टूथपेस्ट में नमक है क्या?” असं विचारु लागल्या. शेंदेलोण मीठ असलेली राखुंडी वापरणे हा मूर्खपणा आहे असे आपल्या मनावर बिंबवून झाल्यानंतर आता पुनः तुमच्या दंतमंजनात मीठ असायला हवे, हे सांगू लागल्या ! बघा, म्हणजे एका अर्थाने आपले पूर्वजच बरोबर होते; असेच ह्या कंपन्या मान्य करीत आहेत.
हल्ली तर कडुनिंबाच्या काड्याही इंटरनेटवर विक्रीसाठी उपल्ब्ध आहेत. आयुर्वेदाने दात घासण्यासठी कडुनिंब, खैर, मोह, करंज, कण्हेर, रूई, जाई, अर्जुन या वृक्षांच्या वीतभर लांबीच्या काड्या दात घासण्यासाठी वापराव्या असे सांगितले आहे. ही काडी टोकाकडे ठेचून घेवून ब्रशप्रमाणे आकार देवून दात घासण्यासाठी वापरावी. कोणत्याही तुरट, तिखट आणि कडू चवीच्या झाडाची ही काडी चालू शकेल. दात घासताना हिरड्यांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. तुरट कडूपणामुळे दातांवरचे किटण जावून हिरड्याही आकसतात आणि दातांची मुळे बळकट होतात. या काडीने दात घासून झाल्यानंतर हीच काडी जीभ स्वच्छ करण्यासाठी tongue cleaner म्हणूनही वापरता येते.
दात घासण्यासाठी मिश्रण (घरगुती टूथपेस्ट्) –
या व्यतिरिक्त पुढील मिश्रण दात घासण्यासाठी वापरता येवू शकते. सुंठ, मिरे, पिंपळी, शेंदेलोण, वेलची, जायपत्री थोडीशी दालचिनी या मिश्रणात पेस्ट सारखे होईल एवढ्या प्रमाणात तिळाचे तेल आणि मध मिसळावे; ही झाली घरगुती पेस्ट तयार ! आठवडाभरासाठी हे मिश्रण तुम्हाला बाटलीतही तयार करुन ठेवता येईल. ही घरगुती पेस्ट बोटावर घेवून दात आणि हिरड्यांवर घासावी. खूप तिखट वाटत असेल तर सुंठ, मिरे आणि पिंपळीचे प्रमाण कमी ठेवावे. शेंदेलोण किंचित् खारटपणा येईल एवढेच घालावे.
दातांच्या आरोग्यासाठी विडा –
दोन नागवेलीची पाने, एक पूर्ण सुपारी, चुना आणि कात यांचा विडा दातांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. तो पाचकही आहे. मात्र विडा खावून झाल्यावर तोंड स्वच्छ धुतले पाहिजे. अन्यथा दातांवर डाग पडण्याचा संभव आहे. या विड्यात कंकोळ, जायपत्री, लवंग, भीमसेनी कापूर घालून विडा अधिक रुचकर बनवता येतो. विड्यातून भरपूर कॅल्शियम मिळत असल्याने दातांचे पोषणही चांगले होते.
दातांचे आरोग्य आणि सौंदर्य टिकविण्यासाठी काही उपाय –
१. तिळाचे तेल किंचित् कोमट करुन तोंड हलविता येणार नाही इतक्या प्रमाणात दात घासून झाल्यानंतर धरुन ठेवावे. लाळ सुटून आत तोंडात तेल मावत नाही अशी स्थिती आली कि तेल थुंकावे. (याला आयुर्वेदात “तैलगण्डूष” असे म्हणतात.) त्यानंतर कोमट पाण्याने गुळण्या कराव्या. यामुळे दात दृढ होतात आणि म्हातारपण आले तरी सहजी पडत नाहीत. हा उपाय सर्वांनी आठवड्यातून किमान दोनदा तरी केला पाहिजे.
२. चाळीशीनंतर रोज चमचाभर (५ ग्रॅम) काळे तीळ, दात घासून झाल्यानंतर चावून चावून खावे. त्यावर साधे किंवा माठातील पाणी प्यावे. आयुर्वेदानुसार हा प्रयोग नियमित केल्यास मरेपर्यंत दात पडत नाहीत.
३. तेलाच्या गुळण्या करणे शक्य नसेल तर रोज दात घासून झाल्यानंतर तिळाचे तेलाने दात आणि हिरड्यांवर बोटांनी मसाज करावा. त्याने दातांचा आणि हिरड्यांचा कोरडेपणा जावून दात मऊ आणि दृढ होतात.
यासाठी नारायण तेलही वापरायला हरकत नाही.
४. दाताच्या विकारांमध्ये आयुर्वेदाने “इरिमेदादि तेल” हे एक औषध दातांना मसाज करण्यासाठी वापरावे, असे सांगितले आहे. हे तेल बाजारात मिळते. या तेलाचाही वापर दात आणि हिरड्यांना मसाज करण्यासाठी करावा.
५. दात बलवान् होण्यासाठी नाकात कोमट केलेल्या नारायण तेलाचे ४ थेंब प्रत्येक नाकपुडीत सोडावे. याला नस्य असे म्हणतात. नस्यामुळेही दात बळकट होतात. दृष्टीही सुधारते.
६. पित्ताचे विकार होवून त्याचे परिणाम दातांवर दिसू लागले असतील तर पित्तशामक औषधोपचार करावेत. यासाठी आयुर्वेदाने “पथ्यादि काढा” हे औषध सुचविले आहे.
७. सर्वांना परिचित असलेले “खदिरादि गुटी” नावाचे औषध खोकला इत्यादिसाठी लोक वापरतात. याचा उपयोग दातांच्या विकारातही होतो. दात दुखत असताना, दातातून रक्त येत असेल तर, हिरड्या सुजल्या असतील तर हे औषध वापरता येते.
या लेखात दातांच्या आरोग्याबद्दल काही सामान्य उपायांची माहिती दिली आहे. दातांशी संबंधित काही गंभीर लक्षणे असतील तर आपल्या वैद्यांशी सल्लामसलत करुन हे उपाय अवलंबावे.
आपणास पटले असेलच की खरे सौंदर्य हे आरोग्यातच दडलेले आहे ! वरवरचे उपाय करण्यापेक्षा आपण सर्वांगाने निरोगी असणे गरजेचे आहे. मग वेगळ्या सौंदर्याच्या उपायांकडे लक्ष देण्याची गरजच पडणार नाही.
आणि हो ! दात स्वतःच्या ठिकाणी योग्य प्रकारे राहिले तर आपले मुखकमल सुंदर दिसणार हे नक्की ! कारण एका सुभाषितात म्हणले आहे, त्याप्रमाणे “स्थानभ्रष्टाः न शोभन्ते दन्ताः केशाः नखाः नराः” ।
अहो ! दातच काय? तर केस, नख आणि माणूसही आपल्या स्थानापासून पतित झाला तर शोभून दिसत नाही ! म्हणून हरेक प्रयत्नांनी दात पडू – झिजू देवू नये, हे उत्तम ! नाही का?
* * *
("दीर्घायु" दिवाळी २०१७ (आयुर्वेद इंडियाचे प्रकाशन) या दिवाळी अंकातील प्रकाशित लेख!)