03/08/2022
#चातुर्मास: आयुर्वेदाच्या चश्म्यातुन
#चातुर्मास: पथ्यापथ्य
🔸 जुलै ते ऑक्टोबर हा चार महिन्यांचा काळ हिंदू, बौद्ध, जैन इत्यादी धर्मीय लोकांमध्ये महत्त्वाचा काळ म्हणून मानला जातो. या काळात बरेच उपास, व्रतं, पथ्यं पाळली जातात. हा काळ हिंदू धर्मात आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या दरम्यान, म्हणजे साधारणतः वर्षा व शरद ऋतुचा काळ आहे.
🔹 आयुर्वेद या चातुर्मासाच्या काळात काही पदार्थ खाऊ नयेत याबद्दल आग्रही आहे.
उदा. हिरव्या पालेभाज्या श्रावणात खाऊ नयेत, भाद्रपदात दही खाऊ नये, अश्विन महिन्यात दूध पिऊ नये, कार्तिक महिन्यात डाळी आणि कडधान्ये खाऊ नयेत अशा प्रकारच्या सुचना आयुर्वेद देत असते.
🔸 आयुर्वेदानुसार, या पावसाळ्या ऋतुत वेगवेगळे आजार आणि संसर्ग होण्याची शक्यता इतर ऋतुंपेक्षा अधिक असते. पावसाळ्यात आपल्या शरीरातील वात, पित्त, आणि कफ या त्रिदोषांचे प्रमाण असंतुलित होते आणि त्याचा परीणाम आपल्या शरीरातील सांधे, चयापचय क्रिया आणि एकूणच आरोग्यावर होतो. विविध प्रकारचे आजार आणि संसर्ग होऊन शरीरप्रकृती बिघडते. सर्दी, पडसे, ताप आणि इतर आजार बळावतात.
🔹 त्यासाठी हे तिन्ही दोष संतुलित अवस्थेत शरीरात कार्यरत असले, तरच शरीराचे आरोग्य चांगले राहते. मात्र ते जर असंतुलित झाले, यातील एखादा घटक अतिरिक्त प्रमाणात वाढला, किंवा कमी झाला तर आपल्याला अनारोग्याला सामोरे जावे लागते.
पावसाळ्यात हे तिन्ही घटक असंतुलित होण्याचे प्रमाण वाढ़ते.
🔸 हे तीन घटक शरीरात काय कार्य करतात ते आधी पाहू –
आयुर्वेदानुसार, आपले शरीर हे सृष्टीतल्या पंचमहाभूतांपासून बनलेले असते. या पंचमहाभूतांमध्ये पृथ्वी, आकाश, जल, वायू आणि अग्नी ही तत्वे असतात. हीच तत्वे आपल्या शरीरातही संतुलित प्रमाणात राहून आपल्या शरीराचे कार्य चालवत असतात. यात मुख्य तीन दोष कार्यरत असतात –
१. वात – म्हणजे वायू. हा शरीरातील उर्जेशी संबंधित घटक असून शरीराची आणि शरीराच्या अवयवांची हालचाल ही या वात घटकावर अवलंबून असते. वर्षा ऋतुत वात प्रकोप होतों म्हणून पंचकर्मातील बस्ती पंचकर्म वातशमनासाठी श्रेष्ठ असते.
२. पित्त –पित्त हा शरीरातील अग्नीशी संबंधित असतो. आपले शरीर अन्न पचवण्याचे काम या अग्नीद्वारेच करत असतो. जर शरीरातील या अग्नीचे म्हणजेच पित्ताचे प्रमाण असंतुलित होऊन कमी जास्त झाले, तर पचनक्रियेत अडथळे येतात. कमी झाले तर त्याला अग्निमंद होणे आणि वाढले तर पित्ताचा प्रकोप होणे असे म्हटले जाते. वर्षा ऋतुत पित्त संचय होत असतो तर शरद ऋतुत पित्त प्रकोप होतो. म्हणून संपूर्ण चातुर्मासात मुख्यतः पित्तकर आहार विहार टाळावे. पित्तासाठी वर्षाऋतुत पित्तशामक बस्ती तर शरद ऋतुत पित्तशोधनासाठी विरेचन ही पंचकर्म करावित.
३. कफ – आपल्या शरीरात पृथ्वी आणि जल तत्व एकत्र येऊन कफ हा गुण निर्माण होतो. त्याचेही प्रमाण संतुलित असले तरच शरीराचे कार्य नीट चालते. अन्यथा शरीराच्या श्वसनक्रियेत अडथळे येऊन अनारोग्य होते. कफदोष विलयनासाठी वर्षा ऋतुत नस्य कफनाशक लेखन बस्ती, तर कफशोधनासाठी वसंत ऋतुत वमन ही पंचकर्म करावित.
म्हणूनच या दोषांना संतुलित ठेवण्यासाठी या काळात पूर्वीचे लोक कमी जेवणं, एकवेळ जेवणं, हलकं अन्न घेणं, आंबवलेले, पचायला जड पदार्थ, डाळी इत्यादी न खाणे, दही-दूध अंडी, मासे, मांस इत्यादी पचायला जड पदार्थ न खाणं इत्यादी पथ्ये पाळत असत.
🔹 दूषित पाणी व त्यात पिकणा–या भाज्या :
या ऋतुत पाणी दूषित होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. या दुषित पाण्याच्या माध्यमांतूनही अनेक आजार होतात. या काळात जमिनीवरच्या लहानमोठ्या जंतूंची उत्पत्तीही वाढते. अनेक अभ्यासांतून हे दिसून आले आहे, की जमिनीतून उगवणाऱ्या हिरव्या पालेभाज्यांतून या जंतूंचा प्रादूर्भाव वाढलेला असतो. उदा. पालक, कॉबी आणि इतर पालेभाज्यांमधून अशा बॅक्टेरिंयांची वाढ होत असते. म्हणून अशा भाज्या या चातुर्मासात न खाण्यासंबंधी सांगितले जाते. पाणी उकळून, व्यवस्थित गाळून पिण्यास सांगितले जाते.
🔸आहाराची पथ्ये –
१. ऑगस्ट ते सप्टेंबर, म्हणजेच आषाढ ते भाद्रपद या तीन महिन्यात पावसाचे प्रमाण सर्वाधिक असते म्हणून या काळात दही, आंबवलेले पदार्थ न खाण्यासंबंधी सांगितले जाते.असे पदार्थ पचण्यास जड असतात आणि पावसाळ्यात वात, पित्त, कफ या त्रिदोषांचे असंतुलन झाल्याने ते पदार्थ पचणे अधिक कठीण होते.
शरीरातील चयापचय क्रिया या काळात मंदावलेली असते, पचनक्रिया कमकुवत झालेली असते.
२. या काळात अल्कोहोलिक ड्रिंक्स, इडली-डोसा, ढोकळासारखे आंबवलेले पदार्थ खाऊ नये. उडीद डाळ, मसूर डाळ इत्यादी डाळी या प्रोटीन्सनी भरपूर असतात. आणि या काळात पचनक्रिया मंदावलेली असल्याने, ह्या डाळी पचण्यास जड असतात म्हणून अशा डाळी देखील चातुर्मासात वर्ज्य करण्यास सांगितले जाते.
३. या चातुर्मासाच्या काळात कांदा, लसूण, अंडी, मांस, मासे इत्यादी पदार्थ देखील वर्ज्य करावे. कांदा- लसूण हे पदार्थ तामसिक असल्याने तुमच्या मानसिक संतुलनावरदेखील त्याचा परिणाम होत असतो. व चातुर्मासची साधना व्रत यात अड़थळा येतो.
🔹तुम्ही जरी या काळात उपासतापास, व्रतं वगैरे करण्यात मानत नसलात, तरी काही खालील गोष्टी लक्षात ठेवल्यात तर या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील :
१. हिरव्या पालेभाज्या नीट बघून, स्वच्छ करून, स्वच्छ पाण्याने नीट धुवून मगच शिजवा.
२. दूध चांगले उकळू प्या. उकळल्यामुळे दुधात असलेले बॅक्टेरिया मरून जातील.
३. दूधामध्ये थोडं पाणी घालून ते पातळ करून प्या. जेणेकरून त्यातील लॅक्टोजचे प्रमाण कमी होऊन ते या काळात पचायला सोपं जाईल.
४. जेवण वेळच्यावेळी घ्या. संध्याकाळचं जेवण लवकर आटोपून घ्या. त्यामुळे चयापचय क्रियेवर ताण न येता त्या व्यवस्थित चालू राहतील.
५. या काळात नित्य नियमित अभ्यंग करुन मग योगासने, व्यायाम प्राणायाम ध्यान दीर्घश्वसन इ. रोज सकाळी लवकर उठून करावे, किमान २० min चालावे शुद्ध हवेत फ़िरुन यावे याने उत्साह वाढतो. रात्री चे जागरण पूर्णत: टाळावे , दिवसा झोपु नये. जेवणानंतर शतपावली करावी वज्रासन करावे.
थोडक्यात काही गोष्टी परंपरेने चालत आलेल्या असतात, त्यामागे काही लॉजिकल कारणे देखील असतात. आपण जरी उपासतापास व्रतं वैकल्यं मानत नसू, तरी काही गोष्टी ऋतु, हवामान, स्थल, काल परिस्थिती इत्यादींवर अवलंबून असतात. त्याप्रमाणे आपल्या आहाराविहारात बदल करणे हे शास्त्रच असल्यामुळे काही गोष्टी पाळल्या, तर त्या आपल्याच आरोग्याला हितकारक ठरतील यात शंका नाही.
वैद्य श्रद्धा जोशी धर्माधिकारी
धर्माधिकारी आयुर्वेद
कोथरुड पुणे
Dr Shraddha Joshi Dharmadhikari
MD Ayu DYA
Ayurvedic Medicine
Panchakarma specialist
Garbhasanskar specialist
Yog Tadnya
www.dharmadhikariayurved.com