03/02/2023
साधारणपणे मुलं १३-१४ वर्षांची झाली की, त्यांच्या करियरबद्दल सीरियस व्हायला आपण सुरुवात करतो, कितीतरी पालक त्याआधीच हा निर्णय घेतात, किंवा तयारी करत असतात. तर, बरेचदा हा निर्णय चांगल्या कॉलेजात अॅडमिशन मिळायला हवी. त्यासाठी चांगले मार्क्स हवेत एवढ्यावरच थांबतो.
teenage मध्ये मुलं आली की, थोडा-थोडा आपल्या स्वत:च्या भविष्याचा विचार करायला सुरुवात करतात. मला आठवतं, साधारणपणे, आठवी-नववीत मला समजू लागलं होतं की, मला गणित आणि विज्ञान आवडत नाही. भाषा विषय आवडतात. ह्याच दरम्यान काही स्वप्नं पहायला सुरुवात झालेली असते.
आता जेंव्हा कधी वेळ काढून मुलीशी गप्पा मारत असते, तेंव्हा स्वत:ची असंख्य स्वप्नं बोलून दाखवते. मला हॉवर्डला जायचंय. travelling करायचंय. कधी सांगते, ड्रॉइंग मला आवडतं खूप वेळ करावसं वाटतं पण ते परीक्षेच्या syllabus मधलं नको, मला त्यापेक्षा सायन्स शिकायला आवडेल, ह्यांत बरेचदा ती पाहत असलेल्या टीव्ही वरच्या मालिका, वाचत असलेली पुस्तकं ह्यांचा परिणाम असतो, पण त्यातून तिची आवड काय आहे ह्याचा शोध घेणं सुरू असतं. तिच्याबद्दल सांगण्याचा उद्देश एवढाच की आताच्या टीनेज मध्ये असणाऱ्या चार मुलांसारखीच ती आहे.
ही अशी स्वप्नं मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची असतात. ह्यांत अर्थ आहे का, ती पूर्ण होतील का, तिची तेवढी बुद्धिमत्ता आहे का, ते पूर्ण करण्यासाठी मी काय करू? तिने काय करावं? हे प्रश्न आई-वडिलांनी जरा बाजूलाच ठेवायला हवेत. मुलांची टीनेज मधली ही स्वप्नं म्हणजे त्यांचा स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न आहे, हळूहळू त्यांना त्यांचं करियर, भविष्य सापडणार आहे. मग आपण काय करायचं, ती जेंव्हा आपल्याशी अशी स्वप्नं शेअर करतील तेंव्हा ते मन लावून ऐकायचं, त्यांना ते अजून छान रंगवू द्यायचं. त्यासाठी लागणाऱ्या पायऱ्या कोणत्या हे ठरवू द्यायचं, आणि त्यादृष्टीने पावलं टाकू द्यायची. हो, पण मध्येच वाटलं त्यांना हे नाही करायचं तर वेळ असतो, आपल्याकडे आणि त्यांच्याकडेही. परत फिरू द्या, पुनर्विचार करू द्या. सातवी-आठवी म्हणजे फार उशीर नाही.
बरेचदा होतं काय, मुलं सातवीत असताना सांगतात, "बाबा मला आयआयटी करायचं. आई-वडील सीरियस होतात. मुलाचं स्वप्नं, त्याची इच्छा. मग आईवडीलच हात धुवून मागे लागतात. 'आयआयटी करायचं ना तुला, मग उठायला हवं सकाळी. अभ्यास केलाच पाहिजे. मार्क्स आलेच पाहिजेत..." मग थोडे वर्षांनी त्याला वाटतं, 'नको हे करायला.' आता आईवडील म्हणतात, "आम्ही नाही फोर्स केला, त्यालाच करायचं होतं." लक्षात घ्या, तो शोधतोय स्वत:ला. इथे जमेल असं वाटतं पण नाही जमत कधीकधी. मग दुसरं काही पहायला नको? मुलांच्या स्वप्नांत आपल्याला रमून नाही जायचं. ते आपल्याला पूर्ण नाही करायचं. आपल्याला फक्त त्यांच्या सोबत राहायचंय.
आज हे, उद्या ते असं वाटतं ह्या वयांत. पण जेंव्हा असं वाटू नये म्हणून आपण (आई-बाबा) प्रयत्न करतो आणि मुलांना लवकर एखाद्या करियरशी जोडून टाकतो; तेंव्हा स्वत:ची ही ओळख शोधणं राहूनच जातं. मग आपण मुलांवर लादलेली ओळख मुलं वागवू लागतात. ओझं होतं त्याचं हळूहळू.
म्हणूनच, हे त्यांचं त्यांना शोधू द्यायला हवं. सापडत नसेल एखाद्याला तर शोधण्यासाठी मदत नक्की करू शकतो आपण. आणि पाठीशी राहू शकतो त्यांच्या.
काही दिवसांपूर्वी, एक गाणं तोंडात बसलं होतं, 'मेरा नाम करेगा रोशन जग मे मेरा राज-दुलारा.' मिहीका ऐकून-ऐकून वैतागली. म्हणून मी सारखंच म्हणायला लागले. ती म्हणाली, "आई, रोशन करण्यासाठी मला माझं नाव आहे. तुझं तू केलेलं आहेस. हवं तर अजूनही रोशन कर. मी माझंच नाव रोशन करणार.." मला पटलं, कुणीही हेच करावं.
- वसुधा देशपांडे-कोरडे
माइंडमास्टर कौंसेलर्स, पुणे
९२२५५०५३६९