04/01/2025
एक लढाई अशी ही
"डॉक्टर ज्यांच्यासाठी कर्ज घेतले ज्यांना वाचवण्यासाठी विष पिलो.. . ..आज ही अवस्था झाली..... आज माझ्यासोबत कोणीच नाही.... माझं ऑपरेशन दरम्यान काही बरं वाईट झालं माझी बॉडी तुम्ही तुमच्या हॉस्पिटलला वापरा तुमच्या शोध कार्यासाठी मी स्वाक्षरी देतो"
सागर गोरे
काळाचा घात कधी कोणावर कसा होईल सांगता येत नाही. म्हणतात ना........" सुखके सब साथी
दुख मे ना कोई..... मेरे राम.... मेरे राम"
सागर गोरे वय 34 वर्षे व्यवसाय कॉन्टॅक्टर बायको मुलांसाठी जग ही ठेंगण झालं होतं. कर्ज काढलं पण व्यवसाय बुडीत गेला. कर्जदारांच्या धमक्या, जाचाला घाबरून, बायको मुलांच्या रक्षणासाठी आयुष्य संपायचा ठरवलं!
घात केला स्वतःचाच! दाहक, मारक, जहाल अस ऍसिड पिलं... पण दैवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं, अजून काहीतरी दुर्देवी योजना होती, प्राण गेला नाही पण अन्ननलिका आणि श्वासनलिका जळून चिकटल्या, अरुंद झाल्या. वाटत होतं प्रत्येक श्वास जीव वाचवण्यासाठी आहे?की मरण यातने साठी आहे ??अशी दुरावस्था झाली. तोंडावाटे खाणे ,पिणे शक्यच नव्हते. ससून मध्ये उपचार झाले, पोटातून फीडिंग पाईप लावल्या गेली आता त्यातूनच जलमय पदार्थांवर राहायचं होतं. त्यातच गरिबीने तिचं खरं रूप दाखवलं. बायको, कुटुंब सगळेच सोडून गेले. पाणीदार पदार्थांवर राहिल्यामुळे शरीर अस्थि पिंजर झालं. बोलणे, उठणे, बसणे कठीण झाले, श्वासनलिका अरुंद असल्यामुळे श्वास कोंडू लागला शरीराची शक्ती गेली आणि आपले म्हणून ज्यांच्यावर सगळं बहाल केलं त्यांनी मरणाहूनही मरण्यासाठी सोडून दिलं. रोजच्या उदरनिर्वाहासाठी आणि औषध पाण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी खर्चासाठी वेगळीच लढाई चालू झाली कारण अशा अवस्थेत कुठे काम करून दोन पैसे कमवता येईल अशी ही अवस्था नव्हती, अनेक ठिकाणी मदत मागूनही निराशा हातात आली. अशा अवस्थेत आभाळमायाविषयी माहिती मिळाली. सागरने मला विनंती केली अपर्णाताई मी जरी , वयाने वृद्ध नसलो तरी माझ्या शरीराची अवस्था आता वृद्धपकाळासारखी च जर्जर झाली आहे. हा मुलगा तरुण असूनही आभाळमायाची माया भाकू लागला. आभाळाची माया सर्वांसाठी असते विना शर्थ! हो ना? म्हणूनच त्याला आभाळमायात आश्रय देण्याचा मी निर्णय घेतला.
स्वामींच्या छत्रछायेत वैद्यकीय सुश्रुषा मिळाली. लवकरच सर्व आजी-आजोबांच्या गळ्यातल्या ताईत झाला. जीवनाला वेगळे स्वरूप मिळाले. माणुसकीची, अध्यात्माची जोड मिळाली, स्वामी.. स्वामी.. जप करता करता आवाज पुन्हा येऊ लागला . पण म्हणतात ना दुर्दैवाने अजूनही साथ सोडली नव्हती, दम लागू लागला डॉक्टरांनी सांगितले की श्वासनलिकेचे मोठे ऑपरेशन करावे लागेल पुन्हा ससून मध्ये ऍडमिट व्हावे लागेल. कदाचित हे ह्या दरम्यान नेहमीसाठी आवाज जाऊ शकेल आणि ऑपरेशन दरम्यान मृत्यूही होऊ शकेल, त्यानुसार ससून मध्ये ऍडमिशन झाले, ऑपरेशन साठी अनुमती पत्रावर, "कन्सेंट लेटर" सही करण्यासाठी तर दूरच परंतु ससून सारख्या भयावह बोर्ड मध्ये जीवन मरणाची झुंज देताना अशा कठीण प्रसंगी खाटेजवळ बसायला घरातली दुसरी कोणी नातेवाईकही नव्हती.बायको आणि सासू ने मेला तर बरच होईल असे म्हणून सांगितले .वयाच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षात दुसऱ्यांदा मृत्यूशी सामना होता .आता तर कुटुंबाचे खरे रूपही जाणून होता. मन घट्ट करून त्याने डॉक्टरांना सांगितले,"माझे काही झाल्यास ही बॉडी तुम्ही वापरा मी तशी सही देतो"
ही बातमी आभाळमायात पसरली सर्वांच्या डोळ्यात पाणी तरळ ले. आम्ही सर्व यंत्रणा फिरवली, ससूनच्या समाज विभागाच्या गायकवाड साहेबांची भेट घेतली, त्याच्या सर्व तपासण्या मोफत केल्या, आभाळामाच्या सर्व आजी-आजोबांनी आभाळमायाच्या सर्व स्टाफ ने रात्रंदिवस एक केला. त्याच्या मागे कुटुंब म्हणून सर्वच उभे राहिले. सर्व आजी आजोबांचे आशीर्वाद म्हणूनच की काय डॉक्टरांशी वार्तालाप केल्यानंतर त्यांना शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे इंडॉस्कॉपी द्वारे प्रयत्न करून त्याचे आवाज वाचवण्याचा प्रयत्न करण्यास सुचवले. सर्वच डॉक्टरांची खूप छान मदत मिळाली. आणि सर्वच प्रयत्नांना यश मिळाले आज माणुसकीचा विजय झाला होता गरीबीचा, कुटुंबाचा कडू अनुभव जरी आला तरी सुद्धा आज सागरचा माणुसकी वरचा विश्वास घट्ट झालेला आहे. आणि त्याला जीवनाची नवी दिशा मिळाली आहे. आता त्याला अन्ननलिकेतून जेवणही जेवता येत आहे. त्याची फीडिंग पाईप लवकरच काढता येणार आहे. देवाने आभाळमायाच्या निमित्ताने हे सर्व चांगले काम करण्यास आमच्या सर्व आजोबांना, माझ्या सगळ्या स्टाफला, मंगल पवार, इंदू मावशी, कोडीलकर आजोबा, प्रमोद ब्रदर, आणि या सर्वांची सांगड घालणारा राहुल फाटक या सर्वांचेच पाठबळ लाभले व आपल्यासारख्यांच्या आभाळमायाला मिळणाऱ्या मदतीमुळेच हे सर्व गोष्टी करण्याची ताकद आम्हा सर्वांना मिळते त्याबद्दल आपल्या सर्वांचे ही धन्यवाद!
डॉक्टर अपर्णा देशमुख
आभाळमाया वृद्धाश्रम
सिंहगड रोड पुणे