12/10/2021
निर्माण व स्मार्ट यांच्या तर्फे "जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा " :
10 ऑक्टोबर 1992 सालापासून दरवर्षी "जागतिक मानसिक आरोग्य दिवस " सर्व जगामध्ये सम्पन्न होतो.
निर्माण मानसोपचार व व्यसनमुक्ती केंद्र, लोहगाव येथे हा दिवस माहिती, चर्चासत्र व मान्यवरांच्या मार्गदर्शनाद्वारे सम्पन्न झाला. कार्यक्रमास डॉ य. व. केळकर, डॉ अजित केळकर, डॉ सदाशिव गाडेकर, प्रा विलास गरुड, प्रसाद चांदेकर मुख्य मार्गदर्शक व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी एबीपी माझा न्यूज चॅनेल वरील "मन सुद्ध तुझं " या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉ.नंदकुमार मुलमुले यांची ध्वनीचित्रफीत व या दिवसाच्या महत्व विशेषावर संदेश दाखविण्यात आला.
दुसऱ्या महायुद्धात प्रचंड नरसंहार, वित्त हानी व भावनिक हानी झाली.यावेळी या भयानक वातावरणातून लोकांना बाहेर काढण्यासाठी, त्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी जागतिक मानसिक आरोग्य संघटनेची निर्मिती झाली. पुढे 1992 सालापासून डेप्युटी सेक्रेटरी रिचर्ड हंटर यांच्या पुढाकारातून प्रत्येक वर्षी पुढे 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून जगातील 156 देशांमध्ये साजरा होऊ लागला.
" जगातील सात पैकी एक मानसिक रुग्ण भारतात आहे व भारताच्या लोकसंख्येच्या साधारण 10 टक्के लोकसंख्या ही मानसिक आजाराला सामोरे जाते. तर लोकसंख्येच्या मानाने फक्त 10 टक्के च मानसोपचार तज्ञ उपलब्द आहेत व देशाच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने ही संख्या वाढणे महत्वाचे आहे, त्याचबरोबर
रुग्णमित्रांनी योग्य व नियमित तपासणीबरोबरच डॉक्टरांचे मार्गदर्शन अतिशय महत्वाचे असल्याचे " प्रतिपादन डॉ सदाशिव गाडेकर यांनी केले.
करोनाच्या विपत्ती काळामध्ये बेरोजगारी, जवळच्या लोकांचा मृत्यू, व्यवसायातील हानी त्याबरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा नवीन शिक्षण पद्धती अवलंब या व अशाप्रकारच्या मोठ्या बदलांमुळे मानसिक आरोग्य उपचार व समुपदेशन यांचे महत्व व अत्यावश्यकता मोठ्या प्रमाणावर अधोरेखित झाली.
याच मध्यवर्ती संकल्पनेस अनुसरून " सर्वांसाठी मानसिक आरोग्य " या विचारसरणीस अनुसरून निर्माण संस्थेत कार्यक्रम साजरा झाला.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे डॉ य.व
केळकर यांनी " रागावर नियंत्रण, योग्य आहार, विश्रांती, ध्यानधारणा यामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहते " असे प्रतिपादन केले.
डॉ.अजित केळकर यांनी मनोरुग्णांसाठी डॉक्टरांचे उपचार, मार्गदर्शन याबरोबर कुटुंबियांचे सहकार्य अत्यंत महत्वाचे असल्याचे नमूद केले.
संस्थेचे मानसोपचार तज्ञ डॉ भालचंद्र काळमेघ यांनी निर्माण मधील विविध उपचार पद्धती व सुविधांची माहिती विशद केली.
संस्थेचे संस्थापक साहेबराव दराडे यांनी मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे मुख्य संयोजन केले.
यावेळी चर्चसत्रांत या मान्यवरांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली व या दिवसाचे महत्व विशद केले.
कार्यक्रमास सुभेदार प्रकाश नवले,सुभेदार मेजर पाटील, अश्विन चव्हाण, कल्पेश कुलकर्णी, नर्सिंग व सहायक स्टाफ व रुग्णमित्र उपस्थित होते.
समुपदेशक पूजा जोशी यांनी आजच्या दिवसाचे जागतिक महत्व विशद केले व सर्वांचे आभार प्रकट केले. सूत्रसंचालन प्रा.प्रकाश दळवी यांनी केले.