27/11/2024
हिवाळा हा ऋतू खरंतर आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम मानला जातो. कारण थंडीत प्रचंड भूक लागते, त्यामुळे आहारही चांगला राहतो. तंदुरुस्त राहण्यासाठीचा हा ऋतू. परंतु, थंडीत विषाणूजन्य आजार होण्याची शक्यताही असते. शहरात वाढलेली धूळ आणि हवेतील प्रदूषण नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकते. त्यामुळे साधारणपणे दिवाळीनंतर सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंग दुखणे अशा तक्रारी डोके वर काढतात.
थंडीत ताप येणे, श्वसनविकार, दमा, कोरडा खोकला अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होते. शीतपेये, शीतपाणी किंवा वातानुकूलित यंत्रणेमुळे काहींना ॲलर्जीदेखील होऊ शकते.
थंडीच्या लाटेचा फटका नागरिकांना बसू शकतो. हवामानातील बदलांमुळे या दिवसांत शीतपेय, शीतपाणी, वातानुकूलित यंत्रणा यामुळे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. हवेतील प्रदूषणामुळे घसा दुखणे, याबरोबरच अन्य श्वसनाचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी थंडीत घराबाहेर पडताना गरम कपडे वापरावे.
ही काळजी घ्यावी?
थंडीत पौष्टिक आहार हवा त्याचबरोबरच फलाहार, सुकामेवा हे उपयुक्त ठरेल. नियमित व्यायाम, माॅर्निंग वॉक निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. शीतपेय, शिळे पदार्थ, उघड्यावरचे खाणे टाळावे. या काळात शरीरातील जास्त ऊर्जा खर्च होत असल्याने भूक लागते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा आहार सेवन करा.
उपयुक्त टिप्स :
या ऋतूत भाज्या आणि फळे भरपूर प्रमाणात खावीत. फळे आणि भाज्यांमध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे हिवाळ्यात आजारांशी लढण्यासाठी प्रभावी ठरतात.
तीव्र हिवाळ्यात शरीराला नैसर्गिक उष्णतेची गरज असते. म्हणून शेंगदाणे, गूळ, खजूर इत्यादी शरीरातील उष्णता टिकवून ठेवणारे पदार्थ खा.
विवाह आणि इतर कार्यक्रमात अन्न खाताना, अन्न गरम आणि ताजे असेल याची काळजी घ्या. अति थंड झालेल्या कोणत्याही गोष्टीचे सेवन करणे टाळावे.
थंडीत रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवावे. हिवाळ्यात मिठाचे सेवन कमी प्रमाणात करावे. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो.
हिवाळा तसा आरोग्यदायी ऋतू आहे. मात्र, थंडी, धुक्यामुळे लहान मुले आणि वृद्धांना श्वसनाचे विकार बाळावण्याची शक्यता जास्त असते. उबदार कपड्यांच्या वापराबरोबर प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढवायला हवे.
डाॅ. मंगेश कुंभकर्ण
शिव हॉस्पिटल, कासार गल्ली ,राहुरी.