13/04/2025
लहान मुलांच्या मोबाईल addiction ला कारणीभूत कोण?
डोळे तपासणीसाठी आमच्याकडे सगळ्या वयोगटातील मुले येत असतात. आजच्या डिजिटल युगात जवळजवळ ९८% पालक त्यांच्या मुलांच्या मोबाईल वापराविषयी चिंतित असतात आणि डॉक्टर म्हणून तुम्ही सांगितलं तरच ते ऐकतील असं आम्हाला सुचवत असतात. सोनारानेच कान टोचावेत अशी पुष्टी ही जोडतात. जरा कळत्या वयातील मुलांशी त्याअनुषंगाने बोलताही येतं. पण कालच्या एकाच दिवसात दोन पालक दांपत्याने त्यांच्या तीन वर्षांच्या मुलांविषयी हीच तक्रार करत तुम्हीच तिला/त्याला समजावून सांगा असा आग्रह केला...त्यावेळी मात्र खरेच आता पालकांचेच कान टोचण्याची योग्य वेळ आलेली आहे हे समजले.
दोन तीन वर्षांची मुले काही स्वतःचा मोबाईल वापरत नसतात. त्यामुळे मूल ज्याचा फोन घेत आहे त्यानेच बदलण्याची गरज आहे हे कठोर शब्दांत सांगावे लागते.
काय कारणे आहेत मोबाईल addiction ची?
१.मोबाईल वरील चित्रे, videos यामुळे मुलांच्या मेंदूला चालना मिळून dopamine हे संप्रेरक निर्माण होते. Dopamine हे instant gratification म्हणजेच ताबडतोब आनंद, उत्तेजना देणारे संप्रेरक आहे. आणि अर्थातच हा आनंद तात्पुरता असतो. त्यामुळे तो आणखी मिळत रहावा यासाठी मूल त्यातच गुंतून राहते.
२.आई वडील, आजीआजोबा त्यांच्या कामात व्यस्त असल्याने मुलाने त्यात व्यत्यय आणू नये म्हणून पालकच मुलांच्या हातात मोबाईल देतात. आणि इथूनच त्यांच्या व्यसनाची सुरुवात होते.
३.घरातील मोठी माणसे सतत मोबाईल घेऊन दिसत असल्यास मूल त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करते.
४.मोबाईल व्यतिरिक्त दुसरे काहीच करण्यास उपलब्ध नसल्यास मुले मोबाईल स्क्रीन मध्ये गुंतून राहतात.
काय आहेत याचे दुष्परिणाम?
१.मुलांची मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि शारीरिक वाढ योग्य रीतीने होत नाही.
२.नैराश्य आणि चिंता म्हणजेच depression आणि anxiety हे विकार जडण्याची शक्यता वाढते.
३.इतर अनेक पद्धती ज्यातून मूल शिकू शकते त्याकडे पूर्ण दुर्लक्ष होते.
उदाहरणार्थ वस्तू हाताळणे, पाडणे, उचलणे.
वस्तूचा रंग, स्पर्श, पोत समजणे.
संवाद करत असताना समोरच्या व्यक्तीकडे पाहून बोलणे ज्यामुळे शब्दांच्या व्यतिरिक्त चेहऱ्यावरील भाव, आवाजातील भावना , चढ उतार शिकता येतात.
३.घर, परिसर आणि निसर्गातील अनेक लहान पण सुंदर गोष्टी, घटना ज्या माणसाला खरा आनंद आणि समाधान देऊ शकतात त्या गोष्टी पाहण्याची सवय आणि शिक्षणच राहून जाते.
काय उपाय करता येतील?
१.स्क्रीन टाईम restrictions हे मोठ्या मुलांसाठी आहे. परंतु दोन वर्षाखालील मुलांना ' शून्य ' वेळ मोबाईल द्यायचा आहे हे पालकांनी जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
२.लहान मुल वाढवणे हे जाणीवपूर्वक करण्याचे जिकिरीचे काम आहे. यात घरातील सगळ्यांचा सहभाग असायला हवा. आई दमत असेल किंवा कामात असेल तेंव्हा आजी, आजोबा, बाबा यांनी मुलांना स्क्रीन फ्री वेळ द्यायला हवा. पालकांनी वेळापत्रक करूनही हे करता येईल. स्क्रीन फ्री वेळात मुलांना गोष्टी सांगणे, सोबत वाचणे,चित्र काढणे, रंगवणे, बाहेर फिरायला घेऊन जाणे, बागकाम करणे, भाज्या निवडताना त्यात मुलाला सामील करून घेणे, मुलांसोबत खेळणे अशा अनेक activities करता येतील. या मुळे मुलांचा बौद्धिक विकास तर होतोच त्यासोबत कुटुंबातील नाते घट्ट होण्यात मदत ही होते. खेळामधून मुलांचे gross आणि fine motor skills विकसित होतात.
३.घरात मोबाईल/गॅजेट्स फ्री झोन असणे.
४.जेवताना मोबाईल टीव्ही किंवा कुठल्याच स्क्रीनचा वापर कुटुंबात कुणीही न करणे.
५.Boredom leads to creativity. कंटाळा येणं ही चांगली गोष्ट आहे ज्यामुळे काहीतरी नवीन घडवण्याची ऊर्जा मिळते. कंटाळा आला म्हणून स्क्रीन पाहणे हे घरातील प्रत्येकाने टाळावे.
' हा/ही आमचं ऐकतच नाही ' यावर पालकांना माझे नेहमी एकच सांगणे असते.
A firm 'No'
' नाही ' मध्ये ठामपणा हवा. चीड,वैताग ही नसावा आणि लाडिक ' नाही ' तर अजिबातच नसावा. लाड आणि प्रेम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे नेहमी लक्षात ठेवावे. लाडाने मुले बिघडतात तर प्रेमाने घडतात.
मुलांना मोबाईल हातात देणं हे तात्कालिक सोपं solution वाटू शकतं परंतु त्यांचे पुढे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतात...त्यामुळे स्क्रीन फ्री mindful वेळ ही घराने आणि घरातील प्रत्येकाने मुलांमध्ये केलेली long term investment असते ज्याचे returns दणदणीत असतात हे आपण लक्षात घ्यायला हवे.
डॉ शीतल खिसमतराव
निरामय नेत्रालय
राजगुरूनगर