11/10/2024
वळणावळणाच्या वाटेची गोष्ट
त्याचा जन्म शेतकरी कुटुंबातील, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्ट्यात असलेलं त्याचं राजुरी गाव. पुण्याहून २ तास तर मुंबईतून ४ तासाच्या अंतरावर. लहान असल्यापासून शेतात जे काम केलं त्यामागील विज्ञान कळलं ते शेतीमध्ये (M Sc Agri) एम एस सी करताना. कॉलेजला असताना, जगाची आणि भारताची भूक भागवायला कारण झालेल्या हरितक्रांतीचे जनक, डॉ नॉर्मन बोरलॉग आणि डॉ एम एस स्वामिनाथन यांची झालेली भेट. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एकूण ६४ विषयांच्या माध्यमातून लक्षात आलेला शेती क्षेत्राचा आवाका; कि जो रोजीरोटीचं साधन, व्यवसाय, अर्थकारण; यापलीकडला असलेला मानवाच्या कृषी संस्कृतीचा चेहरा. या संस्कृतीच्याच आधारे आपले वर्षभराचे सन उत्सव साजरे होत असतात.
शिक्षण पूर्ण झाल्यावर, आपलं जगणं हे नकळतपणे कृषी संस्कृतीशी जोडलेलं आहे याची झालेली जाणीव त्याला वर्धा इथं घेऊन गेली. शेतकरी आत्महत्या प्रश्नावर काम करताना, विनोबा भावेंच्या पवनार आणि गांधींच्या सेवाग्रामचे संस्कार, सजगता आणायला उपयोगी पडत होते. सेवाग्रामला असताना, एका परदेशी पाहुण्याचं, “आम्ही तुमची संस्कृती अनुभवायला भारतात येतो” हे वाक्य आयुष्याची कलाटणी देणारं ठरलं. आणि आतापर्यंत स्वतःची अनुभवसिद्ध पर्यटनाची आवड, व्यावसायिक रूप घेऊन पुढं आली. त्यासाठी त्याने स्टेट बँकेची नोकरी सोडली.
भारत अनुभवायच्या क्षेत्रात काम करायचं तर आधी स्वतः अनुभवायला लागेल. त्यासाठी त्याने कांदा विक्रीच्या व्यवसायातून वर्षभर दक्षिण भारत फिरण्याचा अनुभव घेतला. पुढे कामानिमित्त, हरियाना, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओरिसा, गुजरात, गोवा याही राज्यांमध्ये जाणं झालं. माणसं आणि निसर्गाची प्रकृती अनुभवत असताना, त्याने वाचनाचा छंद जोपासला आणि लिखाणाच्या माध्यमातून व्यक्तही होऊ लागला.
पराशर ऋषींची ओळख अशीच झाली. व्यास ऋषींचे वडील अशी धार्मिक ओळख असणाऱ्या शास्रज्ञाची, आद्य कृषी संस्थापक अशी नव्याने मांडणी यानेच केली. त्यांनी आणि त्यांच्यासारख्या अनेक कृषी शास्रज्ञांनी लिहिलेली, ग्रंथ संपदा मिळवली. भारतीय शेतीतील या सर्वांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी त्याने, ”पराशर कृषी व संस्कृती पर्यटन” या नावाने सुरु केला एक असा उपक्रम, जिथं जगाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांना भारतीय शेतीचा, लोकांचा, स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेता यावा, अभ्यास करता यावा.
सुरवात झाली महाराष्ट्रातील पहिला द्राक्ष महोत्सव साजरा करण्याने. या निमित्ताने सामुहिक पर्यटनाचे मॉडेल पुढं आलं. त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेकांनी त्याविषयी सांगितलं. इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराथी दैनिकांनी त्याची दखल घेतली. इलेक्ट्रोनिक्स वाहिन्यांनी मुलाखती घेतल्या, विविध व्यासपीठांवर त्याला बोलावणं आलं. आणि त्या प्रत्येक ठिकाणी त्याने मांडणी केली ती शेती संस्कृतीची, शेती आधारित लोकसंस्कृतीची, पर्यावरण आणि प्रकृतीची, या सर्वाच्या समतोलाची, त्यातील मानवीय योगदान आणि जबाबदारीची, त्याच्या वारश्याची. म्हणून तर राष्ट्रीय बीज निगम ने त्याला हरियाना व राजस्थान या ठिकाणी शेती पर्यटनाच्या संधींचा अभ्यास करायला बोलावले. मध्य प्रदेश पर्यटन विभागाने जागतिक पर्यटन दिनी ग्रामीण पर्यटनाची मांडणी करण्यासाठी निमंत्रित केले.
जबाबदार पर्यटन आणि जबाबदार नागरिक याची अशी काही सांगड बसली कि २०१४ च्या लोकसभा मतदानाच्या वेळी, मत न देणाऱ्याला बुकिंग मिळणार नाही याची दखल थेट मुंबई मिरर च्या पहिल्या पानावर घेतली गेली. कृषी व ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून अनुभवसिद्ध पर्यटन करायला मिळावे, सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी, एकमेकांच्या जगण्याचा आस्वाद घेता यावा म्हणून, पराशर कृषी व संस्कृती पर्यटन नावारूपाला आलं.
इथं २३ देशातून लोकं येऊन गेले. जेव्हा आपण पराशर चा युट्युब चानेल बघतो तेव्हा कळतं, इथं येऊन गेलेले पाहुणे त्यांच्या मातृभाषेत व्यक्त झाले आहेत. मग त्यात फ्रेंश, जर्मन, जापनीज, इंग्लिश, डानिश तसेच ओरिया, कन्नड, तमिळ, बंगाली, गुजराथी, हिंदी व मराठी अशा विविध भाषांमधील अभिप्राय पहायला मिळतात. अर्थात हे सर्व पर्यटनाच्या दृष्टीकोनातून सुरु होतं. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतीचे पर्यटन कसे समर्पक होईल याची आग्रही मांडणी तो करू लागला. त्यासाठी त्याला सकाळ, अग्रोवन, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी विद्यापीठ अशा विविध माध्यमांतून तो शेतकरी, विद्यार्थी याचं प्रशिक्षण घेऊ लागला. त्याचे विचार आणि संकल्पना, “कृषी पर्यटन- एक शेतीपूरक व्यवसाय” या सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून २०१८ साली लोकांपर्यंत आल्या.
जेव्हा महाराष्ट्र शासनाने कृषी व ग्रामीण पर्यटन धोरण आणायचे ठरवले तेव्हा त्याला, उपयुक्त सूचना मांडायला निमंत्रित केले गेले आणि एवढच नाही तर, हे कृषी व ग्रामीण पर्यटन धोरण, जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी, महाराष्ट्र पर्यटन विभागाचा पहिला पर्यटन प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. त्याने महाराष्ट्र पिंजून काढला, पर्यटन विभागाला लोकांपर्यंत घेऊन गेला. शेती पर्यटनाच्या माध्यमातून शेती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वच घटकांच्या जगण्यात शाश्वतता यावी अशी आग्रही मांडणी तो करायचा. शेती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या घटकांविषयी मांडणी करताना, ज्यांच्यासाठी हे शेती पर्यटन आहे त्या शहरी लोकांनाही त्याने सामाबून घेतले.
तो शेतीच्या गोष्टी सांगायचा, गमती सांगायचा, काही प्रात्याक्षिके करून दाखवायचा. निसर्गात वातावरणानुसार होणारे बदल आणि त्यांचा जीवसृष्टीवर होणारा परिणाम याची छान सांगड घालून सांगायचा. शिवाय हि कृषक संस्कृती तुम्हा आम्हा सगळ्यांशी कशी निगडीत आहे हेही सहजपणे निदर्शनास आणून द्यायचा. पर्यावरणात होणारे बदल यांचं आपल्याशी असणारा थेट सबंध तो, गमती जमतीतूनसहज मांडायचा. त्यामुळेच त्याच्याकडे शाळांच्या सहली यायच्या ते निसर्ग आणि शेतीच्या गमतीजमती, शेतीचे विज्ञान समजून घ्यायला.
कौटुंबिक सहली यायच्या मोकळ्या वातवरणाचा आनंद घ्यायला. महाविद्यालयीन सहली यायच्या ते शेतीचा व्यवसाय आणि अर्थकारण समजून घ्यायला, वास्तूविशारद शिकणारे मुलं मुली यायचे ते ग्रामीण वास्तुरचना समजून घ्यायला, कॉर्पोरेट मध्ये काम करणारी मंडळी यायची ती ग्रामीण अर्थव्यवस्था आणि त्यातील घटक तसेच ग्रामीण भारतातील व्यावसयिक संधी अभ्यासायला येतात.
२०११ पासून पर्यटनाच्या माध्यमातून शेतीची बहुआयामी मांडणी तो अविरतपणे करत राहिला आहे.
शेती आपला पाया आहे, त्यावर उभी राहिलेली इमारत ढगात हरवलीय. आणि तीही इतकी कि आपली इमारत पायावर उभी आहे हेच दिसेनासं व्हावं. उदाहरणार्थ सेलफोनमध्ये अद्यावत फीचर्स येत आहेत पण तो सेलफोन चालायला चार्जिंग लागते हे जसं आपण गृहीत धरून चाललोय अगदी तसच आपल्या ताटात अन्न येणारच आहे हेही आपण गृहीत धरून चाललो आहे. आपल्याकडील श्रीमंतीने आपण कदाचित अन्न विकत घेऊ शकू पण भूक नाही विकत घेता येणार. अन्न हि आपली वैयक्तिक नाही तर वैश्विक संपत्ती आहे. आपण उपलब्ध असलेल्या अन्नाची किंमत करू शकतो पण मूल्य करता येणार नाही. आपल्या अन्नाला असं गृहीत धरणं हे स्वतःलाच गृहीत धरण्यासारखं आहे.
आपण जिथे रहातो, आपल्या आजूबाजूचा निसर्ग आणि पर्यावरण; आपण जे खातो त्याच्या, आपल्या पर्यंतच्या प्रवासाविषयी, त्या प्रवासात सहभागी असणाऱ्या लोकांविषयी, त्या प्रक्रियेतील गमतीजमतीविषयी, कुतूहलाविषयी आणि त्या कृतज्ञतेविषयी; जागरूक आणि सजग होण्यासाठी तसेच शेतीविषयी असणारे समज-गैरसमज, कुतूहल, आस्था, संधी, आव्हाने, शेतीसोबतचा आपला प्रवास आणि आपले भविष्य अशा सर्वच बाबींची एकत्रित मांडणी करणारा “MEAL” (My Environment, Agriculture & Living) हा उपक्रम तो घेऊन येत आहे.
ज्यात असतील निसर्ग, माती-शेतीच्या गमतीशीर गोष्टी, फळ भाज्यांचे मजेदार खेळ, धमाल उडवणारे कार्यानुभव, घरी स्वतः करून बघता येतील असे शेतीच्या जादूचे प्रयोग. कधी मित्रांसोबत, कधी शाळेत, कधी घरी तर कधी प्रत्यक्ष निसर्गात आणि शेतावर जावून करता येईल अशी मनसोक्त धमाल. त्या दिवशी शाळेत फ़क़्त मजा, मस्ती आणि धमाल एवढच असेल. यातून खेळ खेळत, गोष्टी ऐकत, स्वतः करून बघत, मुलांच्याही नकळत त्यांना कळून जातील अशा अनेक गोष्टी ज्या त्यांच्या अभ्यासक्रमात आहेत, ज्या समजणे त्यांना गरजेचे आहे, ज्या त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर घालणाऱ्या आहेत, ज्या त्यांना माणुस म्हणून अजून संवेदनशील बनवणाऱ्या आहेत. तसेच प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊनही हि सगळी मजा स्वतः अनुभवता येणार आहे.
MEAL हा उपक्रम शाळेत, शाळेच्या वर्गात आणि मैदानात घेता येईल. आपल्या मुलाच्या वाढदिवसाला जसा आपण जादूचा प्रयोग ठेवतो तसाच शेतीशाळा उपक्रम सुद्धा आयोजित करता येईल. सोसायटीचा वर्धापन दिन आहे किवा सोसायटीत काही कार्यक्रम आहे, तिथेही “MEAL” कामात येईल. कामाच्या ठिकाणी, कंपनीत काही इवेन्ट आहे, तिथेही MEAL, value addition करेल. त्याचं कारण असं कि “MEAL” च्या माध्यमातून होणारा सेल्फ आणि फूड अवेरनेस हा फ़क़्त शालेय जीवनातच गरजेचा आहे असं नाही, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर फूड अवेरनेस, फूड इंट्रोड्कशन, फूड एजुकेशन महत्वाची भूमिका बजावते.
खरतर MEAL हा पराशर कृषी व संस्कृती पर्यटनाने सुरु केलेला एक उपक्रम नसून, ती एक चळवळ आहे. या चळवळीचं उदिष्ट आहे स्वतःची जाणीव, स्वतःच्या अन्नाची आणि त्यासाठीच्या सर्वांच्याच कष्टाची जाणीव, निसर्गाची नाळ जोडली असल्याची जाणीव. यात आपणही सहभागी होऊन एक सशक्त आणि सुदृढ भविष्य घडवूया.
MEAL संकल्पना - मनोज हाडवळे
संचालक- पराशर कृषी व संस्कृती पर्यटन
M Sc Agri
manoj@hachikotourism.in
9970515438
7038890500