11/09/2025
*चला कथानक बदलूया*
“डॉक्टर, मी खरंच थकलोय… कधी कधी वाटतं, सगळं संपवावं.”
निखिल (नाव बदललेले) २२ वर्षांचा कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी. *माझ्या ओपीडीमध्ये शांत बसलेला होता, पण चेहऱ्यावर प्रचंड अस्वस्थता होती. तो सांगत होता की गेल्या काही महिन्यांपासून तो सतत उदास आहे, मित्रांपासून दूर गेला आहे, अभ्यासात लक्ष लागत नाही आणि अनेकदा रडू येतं. त्याला झोप लागत नाही, आणि रात्री विचारांचा पूर सुरू होतो. काही वेळा त्याने मृत्यूचे विचारही मनात येतात.* खर तर निखिल एक हुशार मुलगा आहे. त्याचे वडील नोकरीसाठी बाहेर असतात तर आई गृहिणी आहे. घरात आर्थिक तणाव नाही, पण त्याला काही दिवसापासून उदास वाटायला लागले होते. त्याला वाटते की तो अपयशी आहे, कुणाला उपयोगी नाही. कॉलेजमध्ये मागे पडल्याची भावना, सामाजिक तुलना, सोशल मीडियावरचे दबाव या सगळ्यांनी त्याचं मन ढवळून टाकलं आहे. *@ डॉ अतुल ढगे*
मी त्याचं बोलणं शांतपणे ऐकलं. आत्महत्येचे विचार हे केवळ दुर्बळपणाचे नाहीत, तर गंभीर मानसिक त्रासाचे लक्षण आहेत हे समजावून सांगितलं. हा नैराश्याचा आजार आहे आणि यावर उपचार होतात, मदत मिळते, हेही त्याला समजवल.
*जगभरात दरवर्षी ७.२ लाखांहून अधिक लोक आत्महत्या करतात. खरतर आता आत्महत्येचा फक्त वैयक्तिक समस्या राहिली नाही तर ती एक कौटुंबिक, सामाजिक आणि वैश्विक समस्या झाली आहे. प्रत्येक आत्महत्या कुटुंब, समाज, संस्था, देश यांच्यावर खोल जखम ठेवून जाते. परंतु आत्महत्येच्या विचारांनी ग्रस्त व्यक्तींना ‘मदत मागणं’ कठीण वाटतं, कारण अजूनही या विषयाभोवती संकोच, लाज, गैरसमज आणि सामाजिक कलंक आहेत.*
*वर्ल्ड सुसाईड प्रिवेन्शन डे (World Su***de Prevention Day) दरवर्षी १० सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसामागे प्रमुख उद्देश आहे — आत्महत्या रोखणे हे शक्य आहे, हे जगाला दाखवणे. आणि २०२५ या वर्षीची थीम आहे: “Changing the Narrative on Su***de” – चला आत्महत्येचे कथानक बदलुयात. म्हणजे आत्महत्येबाबतचे विचार बदलणे, आपले विचार, समज, आत्महत्येविषयी विचार करण्याची पद्धत बदलणे व आत्महत्या करणाऱ्या बाबतीत किंवा त्याचा विचार करणाऱ्याच्या बाबतीत, बोलणारीच्या बाबतीत सहनभूतीने, दयेच्या भावनेने बघणे व त्यांना तसे वागवणे.* ही थीम मुख्यता खालील काही गोष्टी अधोरेखित करते.
*1. आत्महत्या म्हणजे दुर्बळपणा नव्हे, तर मानसिक त्रासाचं लक्षण आहे हे सर्वांपर्यंत पोहोचवणे.*
*2. आत्महत्या हा विषय शांततेत गुप्त ठेवण्यासारखा नसून, त्यावर खुली आणि करुणामय चर्चा गरजेची आहे.*
*3. मदत मागणं ही कमकुवतपणाची खूण नाही, तर धैर्याची आणि जबाबदारीची खूण आहे.*
*4. केवळ वैयक्तिक मदतीपुरते न थांबता, शासकीय पातळीवर धोरणात्मक बदल घडवणे — म्हणजे सार्वजनिक धोरणांमध्ये मानसिक आरोग्याला अग्रक्रम देणे.*
*5. आरोग्य सुविधा सुधारणे, वयक्तिकरित्या सुलभ आणि दर्जेदार मानसोपचार सेवा उपलब्ध करून देणे.*
*@डॉ अतुल ढगे*
आपण या निमित्ताने पाहूयात काही गैरसमज जे आपल्याला डोर करणे गरजेचे आहेत जेणे करून ही थीम अमलात आणणे आपल्या सर्वांना सोपे जाईल.
*1. गैरसमज: आत्महत्या करणारे लोक नेहमी मरायचंच ठरवूनच असतात.*
सत्य: अनेक वेळा आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तींच्या मनात संभ्रम असतो. ते खरोखर मरायचं ठरवत नाहीत, तर ते दुखातून, वेदनेतून किंवा संकटातून सुटका शोधत असतात. योग्य वेळी मदत दिल्यास त्यांचा विचार बदलू शकतो.
*2. गैरसमज: जे लोक आत्महत्येबद्दल बोलतात, ते खोटं बोलतात किंवा केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी बोलतात.*
सत्य: अशा व्यक्तींच्या बोलण्यातून मदतीची साद असते. आत्महत्येचा विचार हे गंभीर मानसिक स्थितीचं लक्षण असू शकतं आणि त्याकडे दुर्लक्ष केल्याने धोका वाढतो.
*3. गैरसमज: आत्महत्या ही फक्त दुर्बळ लोकच करतात.*
सत्य: मानसिक आजार, भावनिक वेदना, किंवा परिस्थितीचा ताण कोणालाही असू शकतो — मग तो व्यक्ती कितीही ताकदवान का असेना. आत्महत्या ही मानसिक आरोग्याशी संबंधित बाब आहे, दुर्बळपणाची नव्हे.
*4. गैरसमज: आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तींना रोखता येत नाही.*
सत्य: आत्महत्या रोखणे शक्य आहे. समजून घेणे, संवाद साधणे, मदतीचा हात देणे आणि वेळेवर उपचार मिळणे, हे सर्व घटक आत्महत्या टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात.
*5. गैरसमज: एकदा कोणी बरे झालं की आत्महत्येचा धोका संपतो.*
सत्य: मानसिक आजारांमध्ये पुनरावृत्तीचा धोका असतो. उपचारानंतरही निगराणी आणि पाठपुरावा आवश्यक असतो.
*6. गैरसमज: आत्महत्या ही अचानक उद्भवणारी कृती असते.*
सत्य: बहुतांश वेळा आत्महत्या हा एक धीम्या पद्धतीने वाढणारा विचार असतो — ज्यामध्ये खूप संकेत मिळतात जसे की एकटेपणा, निराशा, बोलण्यात बदल, सोशल मीडियावरील सुराग इ.
*7. गैरसमज: आत्महत्या फक्त काही विशिष्ट लोकांमध्येच आढळते (उदा. गरीब, वृद्ध).*
सत्य: आत्महत्या ही वय, लिंग, आर्थिक, शैक्षणिक किंवा सामाजिक पार्श्वभूमी यावर अवलंबून नसते. कोणालाही ही भावना येऊ शकते.
*8. गैरसमज: आत्महत्या झाल्यावर त्या व्यक्तीविषयी बोलणं चुकीचं आहे.*
सत्य: मृत व्यक्तीबद्दल करुणेने आणि संवेदनशीलतेने बोलणे आवश्यक आहे. यामुळे इतरांना बोलण्याची हिंमत मिळते आणि समाजातील कलंक कमी होतो.
*9. गैरसमज: जे धर्म निष्ठावान असतात, ते आत्महत्या करत नाहीत.*
सत्य: मानसिक आजार, ताण, आणि वेदना धर्म, श्रद्धा किंवा संस्कृतीशी संबंध न ठेवता कोणा प्रत्येकाला लागू होऊ शकतात.
*10. गैरसमज: आत्महत्या हा स्वार्थीपणा आहे.*
सत्य: बहुतेक वेळा आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला वाटतं की तो इतरांसाठी ओझं आहे, आणि त्यामुळे तो स्वतःहून दूर होतो. हे निर्णय त्यांच्या वेदनेमुळे घेतलेले असतात, स्वार्थामुळे नव्हे.
जर हे गैरसमज आपण दूर केले आणि खुलेपणाने संवाद केला, करुणा भावना ठेवली आणि मनापासून मदत केली तर अनेक जीव वाचू शकतात. होय फक्त वेळेत बोलून, ऐकून, समजून आणि हात दिल्याने कित्येक आत्महत्या टाळता येतात. *@डॉ अतुल ढगे*
शेवटी मी निखिलला सांगितलं — “तू एकटा नाहीस. मी आहे, तुझं ऐकायला, समजून घ्यायला आणि मदत करायला. पण तुला बोलावं लागेल. तुझ्या आतल्या वेदनेला शब्द द्यावे लागतील.” त्या दिवशी त्याच्या चेहऱ्यावर प्रथमच थोडा हलकासा विश्वासाचा प्रकाश झळकला.
चला, आपण असे अनेक कथानक बदलूया. चला, संवादाला आणि सहानुभूतीला प्राधान्य देऊया.
*डॉ अतुल ढगे*
*मनोविकारतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ*
*रत्नागिरी व नवी मुंबई*