15/09/2024
ब्रम्हचर्य सारखा नाजूक आणि उघड चर्चा करण्यासाठी कठीण असलेला विषय आजोबांनी सहज समजाऊन सांगितल्यावर रघुचा उत्साह आणखी दुणावला. आज आणखी काय बरे आजोबा सांगतील हा विचार त्याच्या मनात घोळत होता आजच्या कथेत त्याला सामान्य माणसाची साठवण्याची प्रवृत्ती कशी चुकीची आहे हे कळणार आहे आता पुढे......
___________
पुष्प ७ वे
अपरिग्रह
आज रघूला जरा उशीरच झाला होता. तो आश्रमाशी पोहोचला. त्याला धाप लागली. फाटकाजवळ पोहोचताच उभ्या उभ्याने त्याने मोठा श्वास घेतला व तेवढ्याच वेगाने बाहेर सोडला. असे ४-५ वेळा केल्यावर त्याला बरे वाटले. त्याची धाप थांबली.
आजोबा लांबून त्याची ही गंमत बघत होते. ते हसले. हे हसणे समाधानाचे होते. रघूने योगाचे प्रत्यक्ष आचरण करायला सुरुवात केली होती. चार पावले ते पुढे आले व म्हणाले,
'काय रघूभाऊ वाघबीग पाठी लागला की काय?' समोरच आजोबांना बघून रघू वरमला.
'नाही हो आज थोडा उशीर झाला ना, म्हणून धावत आलो. त्यामुळे दम लागला.' 'का उशीर झाला, घरी सगळी बरी आहेत ना?'
हो, सगळी बरी आहेत. बायकोने माळ्यावरची सगळी अडगळ काढली होती ना माळा साफ करायला; ती आवरता आवरता उशीर झाला.'
'असं असं ! रघू, अशी विचारांची अडगळ होऊ देऊ नको. चटई अंथरत आजच्या विषयाला आजोबांनी नकळत सुरुवात केलीही. रघूला त्यांनी बसण्याची खूण केली. आज काहीतरी नवीन सांगण्याच्या मुडमध्ये आजोबा आहेत, हे रघूच्या लक्षात आले. तो मुकाट्याने चटईवर बसला. आजोबा उकाळा आणण्यासाठी आत गेले. रघू सुखासनात बसला. अलिकडे त्याला शांत बसणे आवडू लागले होते. आजोबाच्या पावलांची चाहूल लागताच त्याने डोळे उघडले. उठून त्याने आजोबांच्या हातातील उकाळ्याचा कप घेतला. उकाळा त्याला आवडू लागला होता. घरीही त्याने एक-दोनदा बनवला होता. परंतु आजोबांच्या हातची चवच न्यारी !
'का रे रघू, दिवाळी जवळ आली म्हणून का अडगळ काढलीस?' उकाळा पिता पिता आजोबांनी विचारले.
मान हलवून रघूने होकार दिला. 'आजोबा एक विचारु, मघाशी तुम्ही विचारांची अडगळ म्हणालात; ते काही समजले नाही. विचारांची अडगळ मी पहिल्यांदाच ऐकतोय.'
आजोबा हसले आणि म्हणाले, 'मी . पाचव्या यमाबद्दल म्हणालो.'
'पाचवा यम?' चौथा ब्रह्मचर्य त्याला समजला होता. 'किती यम आहेत आजोबा ?' रघूने उत्सुकतेने विचारले.
'पाच, चार यम मी तुला सांगितले आणि ते तू आचरणातही आणू लागलाहेस. मला खूप आनंद होतोय तुझी प्रगती बघून.'
रघूचे अंग शाहारले. कुणी आपले कौतुक केल्यावर मनावर होणारा परिणाम तो पहिल्यांदाच अनुभवित होता. आपण इतरांचेही कौतुक केले पाहिजे हे त्याला लक्षात आले.
'आजोबा ह्या पाचव्या यमाबद्दल सांगाच, दुपारपासून मन पण बघा कसं अडगळीसारख झालंय . रघू उताविळपणे म्हणाला. आजोबा हसले. दोघांचेही कप रिकामे झाले होते. रघूने दोघांचेही कप आत नेले. व धुवून जागेवर ठेवले.
'हं, बोला अगदी लहान मुलासारखा बसत रघू म्हणाला. आजोबांना रघूच्या निरागसतेची गंमत वाटली. रघूच्या वागणुकीत होत चाललेला बदल बघून त्यांना आत्मिक समाधान वाटत होते. रघूला त्यानी आपल्या जवळ बसायला सांगितले व प्रेमाने म्हणाले,
'रघू, मी सांगायच्या आधीच नकळत का होईना तुला अपरिग्रह समजला आहे.'
'मला समजला? तो कसा?'
'आता तू काय म्हणालास, तुझ्या डोक्यात विचारांची अडगळ झाली आहे. हो ना?'
'हो, ती झालीच आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही आता बोलल्यावर ती संपूर्ण नाहीशी होणार आहे.'
'अरे यालाच अपरिग्रह म्हणतात.'
'तुम्ही कोड्यात बोलू नका. मला काही समजत नाही. मला समजेल असे बोला ना!'
'बरं बरं, पहिले मला आधी आपण कोणकोणते यम पाहिले ते सांग बघू. 'बघा हं, पहिला अहिंसा दुसरा सत्य, तिसरा खोटे बोलू नये, आणि चौथ्याचं काय बरं म्हणतात त्याला ब्रह्मचर्य.'
'ब्रह्मचर्य!' हसत आजोबा म्हणाले. 'तेच ते.'
'पाचवा यम आहे अपरिग्रह. म्हणजे जमा न करणे. ज्या वस्तू आपल्या उपयोगाच्या नाहीत किंवा आता लगेच त्यांची गरज नाही त्या साठवून ठेवू नयेत. आपल्याला ज्या विषयांपासून सुख मिळते अशा विषयांचा व ज्या साधनांपासून ते मिळते त्या साधनांचा संग्रह करण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो. असा संग्रह करणे म्हणजे परिग्रह. आणि न करणे म्हणजे अपरिग्रह. असे पतंजलीचे म्हणणे आहे. आता तू जी दुपारी अडगळ काढलीस त्यात कोणत्या वस्तूंची तुला गरज नाही ते सांगशील?' आजोबांनी विचारले.
'जवळ जवळ सगळ्याच वस्तू बिनकामाच्या होत्या.' हसत रघू म्हणाला.
'तरीही निम्म्याधिक वस्तू कामाच्या नसूनही परत कोंबून ठेवणार आहात की नाही माळ्यावर?'
रघू चपापला. आजोबा पुढे म्हणाले, 'लग्नात मिळालेले हंडे, कळशा, पातेली, गोणपाट, मोठ्या ट्रंका त्यात असतील, हो की नाही.'
रघू ऐकतच राहीला. 'आजोबांना कळलच कसं' त्याला आश्चर्य वाटले. त्याने गुपचूप मान डोलावली. मात्र तरीही त्याच्या मनात प्रश्न निर्माण झालाच,
'पण आजोबा, काही गोष्टी आज नाही तरी उद्या, भविष्यात उपयोगी पडतीलच ना? त्यात आम्ही गृहस्थी, ऐनवेळेला काही लागलं तर आणायचं कुठून ? म्हणून ठेवावं लागतं हो! रघूने आपले मत मांडले. 'रघू नीट विचार करुन बघ, ज्या वस्तूंना तू उपयोगी म्हणतोस त्या किती वर्षे माळ्यावर पडून आहेत बरे?'
'हं, हे मात्र खरं आहे तुमचं, बरीच वर्षे त्या पडून आहेत.'
'अशा अडगळीमुळे धूळ साचते, उंदीर घुशींचा वावर सुरु होतो, एखादा बाहेरचा विषारी साप, विंचू आपली वस्ती करतात. त्यामुळे घरातील माणसांना धोका निर्माण होतो. बरोबर की नाही?'
'पण मग अशा बऱ्याच गोष्टी आपण साठवतो. धान्य साठवतो, कपडे साठवतो इतकेच काय पाणीही साठवतो. घर संसार चालवायचा असेल तर हे सर्व करायलाच हवे. मला तर यात काही चुकीचे वाटत नाही.' रघू गोंधळला.
'रघू तुझे म्हणणे एक वेळ खरे मानू. हे सर्व साठवल्याशिवाय आपला संसार चालणार नाही. गरज असेल तर साठा करायलाच हवा. वर्षातून एकदाच धान्य पिकत असेल तर एक वर्षासाठी त्याची बेगमी करायलाच हवी. दोन-तीन दिवसांनी पाणी येत असेल तर तेवढे पाणी साठवून ठेवायलाच हवे. पण तूच प्रामाणिकपणे सांग आपण असे खरेच गरजेपुरतेच साठवतो कारे?'
रघू आणखी गोंधळला. एक वेगळाच विचार त्याच्याही मनात चमकून गेला, मनात खळबळ सुरु झाली. आजोबांचे बोलणे त्याच्या अडगळीत पडलेल्या मनावर प्रकाश टाकीत होते. परंतु आतला अंधार एवढा की ह्या प्रकाशाच्या बारीक लकेरीने स्पष्टता येत नव्हती. नम्रपणे तो म्हणाला, 'आजोबा तुम्ही खरेच म्हणताय,
कपड्यांचेच बघाना घरात ढीगांनी कपडे आहेत. प्रत्येकाचे आठ आठ, दहा दहा जोड; पण तरीही सणासुदीला नवीन कपड्यांचा सगळी हट्ट करतात. देवाने पुरेल इतके धान्य व सोयी दिल्या आहेत. तरीही बायकोला आणखी पैसा हवा. साडीचोळी हवीच त्यावर शोभेल असा दागिनाही हवा. अगदी खरयं! गरजेपेक्षा कितीतरी अधिक माझ्या घरात कोंबलेले आहे हे आज माझ्या लक्षात आले.'
'यालाच म्हणतात परिग्रह!'
'परंतु हा नियम न पाळल्यास नुकसान काय आहे ते मला समजले नाही' रघूने विचारले.
आजोबा हसले. 'कमाल आहे रघू तुझी, आज दिवसभर इतकी दमछाक झाली, धापा टाकीत तू आलास हा काय कमी त्रास झाला का? विचार कर या वस्तूंची त्या वेळीच विल्हेवाट लावली असतीस तर आज ही वेळ आली असती का? अजून एक गंमत सांगतो, चांगलं घर बांधलसं, त्याला मोठा दरवाजा, मोठा कुलूप, आत उंची सामान, दागदागीने, सर्व महागड्या वस्तू घरात ! असे घर बंद करुन एक दिवस तरी तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाऊ शकाल काय? तिथला आनंद घेऊ शकाल काय?' आजोबांनी विचारले
'छे छे! सगळ लक्ष घराकडे लागेल. चोऱ्या किती होतात अलिकडे, घर बंद दिसले की लगेच फोडतात. आमचे चुलते शहरात राहतात. गावाच्या बाहेर जागा घेऊन त्यांनी चांगला मोठा बंगला बांधला. आतून बाहेरुन चांगला सजवला. सर्व चीजवस्तूंनी भरला. आणि मागच्याच महिन्यात कुणी नसतांना चोरट्यांनी तो फोडला आणि सर्व लुटून नेले की हो ! त्याचा धक्का वहिनीला बसला अजूनही सावरली नाही त्यातून. सगळ्या चीजवस्तूत जीव गुंतला होता ना तीचा.'
'म्हणूनच अपरिग्रह हा महत्त्वाचा यम आहे. ईश्वराने आपल्याला गरजेपुरते दिलेले असते. त्याचा नीट उपयोग केला तर आपण आनंदाने जगू शकतो. गरजा ह्या न संपणाऱ्या असतात. त्यांना आवर घालणे हाच मोठा उपाय. समजतयं का?' आजोबांनी शांतपणे विचारले.
'मला घरी जायला हवे, नाहीतर बाहेर काढलेला अडगळीचा ढीगारा परत बायको माळ्यावर ठेवेल, असे म्हणून रघू लगबगीने उठला व आजोबांचा निरोप घेऊन झपझप पावले टाकीत दिसेनासा झालाही. आजोबा कुतुहलाने त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहातच राहिले...क्रमशः