20/09/2025
*होमिओपॅथीची माहिती सर्वसामान्यांना व्हावी आणि या शास्त्राचा प्रचार आणि प्रसार खेड्यापाड्यापर्यंत व्हावा या हेतूने सुरू केलेली लेखमाला...*
डॉ. मधुसूदन वैद्य. एम्. डी. (होमिओपॅथी)
मु. पो. खंडाळा. ता. जि. रत्नागिरी.
९६५७८००६९७
लेखांक ३
*होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हानेमान यांचे जीवनचरित्र भाग २.*
वयाच्या विसाव्या वर्षी १७७५ साली ते वैद्यकीय शिक्षणासाठी लेप्सीकला गेले. "प्रत्येक गोष्ट पारखून घे आणि जे चांगलं आहे ते आत्मसात कर" असा कानमंत्र त्यांच्या वडिलांनी दिला होता तो त्यांनी आपल्या जीवनाचाच मंत्र बनवला. आता हानेमन स्वतःच्या पायावर उभे राहिले होते. आपले शिक्षण करण्यासाठी त्यांनी फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकवण्यास तेथे सुरुवात केली. त्यासाठी ग्रीक, लॅटिन, इंग्लिश, हिब्रू, इटालियन, जर्मन अशा सुमारे डझनभर भाषांवर त्यांनी प्रभुत्व प्राप्त केले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते व्हिएन्ना येथे आले.
तत्कालीन प्रख्यात चिकित्सक डॉ. व्हॉन कुरीन यांचे ते इतके लाडके बनले की त्यांच्या खाजगी दवाखान्यात या एकमेव विद्यार्थ्याला सहज प्रवेश मिळत होता. रूढ वैद्यकीय शिक्षणाबरोबरच, इतर सहयोगी शास्त्रांचाही अभ्यास ते करत होते. १७७९ साली त्यांनी अॅलोपॅथीतील M. D. ही पदवी प्राप्त केली.
१७८१ साली डॉक्टर हानेमन यांनी आपली वैद्यकीय सेवा सुरू केली. वयाच्या 27 व्या वर्षी त्यांचा विवाह संपन्न झाला. हानेमान यांचे जिथे पोस्टींग झालेले होते तिथेच आता हे नवपरिणीत जोडपे राहू लागले. आत्तापर्यंत हानेमान यांनी तीन वेळा वसतीस्थान बदलले होते. याच ठिकाणी १७८४ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीचा जन्म झाला. येथेच त्यांनी एका रासायनिक पदार्थ बनविण्यासंदर्भातील फ्रेंच पुस्तकाचे भाषांतर केले. अजूनही काही भाषांतरे वेगवेगळ्या नियतकालिकात प्रसिद्ध केली. आणि याच वर्षात त्यांनी गंडमाळा रोगावरील स्वतःच्या पुस्तकाचेही प्रकाशन केले.
दरम्यान तत्कालीन वैद्यकीय उपचार पद्धतीतील मोघम आणि असमाधानकारक ज्ञानामुळे हानेमान व्यथीत झालेले होते. "तज्ञ चिकित्सकांकडून वैद्यकाच्या पुनर्बांधणीची अत्यावश्यकता" या विषयावर त्यांनी हुफलॅंडला पत्र लिहीले. त्यात ते म्हणतात, "एखाद्या रुग्णाची चिकित्सा करताना, हे अंधारात चालणं आता माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक होत आहे. कोणत्यातरी पुस्तकात, काहीतरी गृहीतक दिलेले आहे, त्याच्या आधारावर जे औषध नेमकं कशाप्रकारे काम करतं हेच माहीत नाही असं औषध चिकित्सेसाठी वापरावं लागतं. कशासाठी आपण औषध देतोय हे माहित नाही, रुग्णाला काय झालंय याचा नेमकं ज्ञान नाही, आपण दिलेलं औषध नेमकं काय करतं हेही माहित नाही अशी चिकित्सा करण्याचा मला खूप त्रास होतो. एखाद्या आजारी रूग्णाला औषध दिल्यानंतर अधिक नवीनच गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण होतात, त्याचा मृत्यूही होतो, अशाप्रकारे एखाद्या जीवाला कष्ट देणे अथवा त्याचा खुनी होणे हे माझ्यासाठी इतकं भीतीदायक आहे की लग्नानंतर लवकरच मी माझी वैद्यकीय सेवा बंद करून स्वतःला रसायनशास्त्रात गुंतवून घेतलं आहे. पण आता मी बाप झालो आहे, जेव्हा माझी पोटची पोरं आजारी पडतात आणि त्यांनाही मी काही सुयोग्य उपचार करू शकत नाही तेव्हा माझ्या मनातील या शंका अधिकच वाढत जातात... "
या तत्कालीन वैद्यकाच्या अविश्वासार्ह परिस्थितीमुळे व्यथीत होऊन अॅलोपॅथिक M. D डिग्री हातात असलेल्या डॉक्टर हानेमन यांनी आपली वैद्यकीय सेवा बंद करून अर्थार्जनासाठी स्वत:ला भाषांतराच्या कामात झोकून दिले.
आजही प्रगत वैद्यकशास्त्राची परिस्थिती फारशी वेगळी नाही. अनेक आजार का होतात हे हानेमान यांच्या काळापेक्षा खूप प्रमाणात कळले असले तरीही सोरीयासीस, क्रॉह्न्स डिसीज सारखे काही आजार का होतात हे अजूनही वैद्यकाला कळलेले नाही. काही आजार का झालेत ते तपासण्याची पद्धती निर्माण झाली असली (उदा. अनेक प्रकारचे त्वचाविकार किंवा मेंदू आणि चेतासंस्थेशी संबंधीत काही विकार) तरी त्याच्यावर *सुयोग्य* उपचार काय आहेत हे अजूनही ठरवता आलेले नाही. आणि सगळ्यात जास्त हानेमन ज्या गोष्टीने व्यथीत झाले ते म्हणजे *एक आजार बरा करण्यासाठी एखादे औषध दिल्यानंतर दुसराच काहीतरी गंभीर आजार निर्माण होतो*, ऍलोपॅथीची ही परिस्थिती आजही जशीच्या तशीच आहे असे दुर्दैवाने म्हणायला लागते.
पण ही सद्सद्विकेकबुद्धीची टोचणी डॉक्टर हानेमन यांना असल्यामुळेच त्यांनी आपली सेवा बंद केली. अर्थात देव करतो ते भल्यासाठी.. यातूनच पुढे होमिओपॅथीचा शोध कसा लागला हे आपण पुढील भागात पाहू...
क्रमश:
डॉ. मधुसूदन वैद्य. एम्. डी. (होमिओपॅथी)
मु. पो. खंडाळा. ता. जि. रत्नागिरी.
02357243314, 9657800697
www.anandhomeopathic.in
खालील लिंक वर क्लिक करून कोणिही हा गृप जॉईन करू शकतो. ही गृप लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला हरकत नाही.
https://chat.whatsapp.com/GKhPwketEkD8a7YwQX8xdf?mode=ems_copy_t
Anand Homeopathic Research Center offers best Homeopathic Treatment at affordable price. Every disease is treatable if Homeopathic data becomes available. Call for more details.