30/07/2025
“आगळ्यावेगळ्या आजी”
आपल्या आजूबाजूला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची माणसं राहत असतात. एक होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून पेशंट बघताना, खूप वेगवेगळ्या स्वभावांचे पेशंट बघायला मिळतात. तर असाच एक अनुभव मी तुम्हाला आज सांगणार आहे.😊
एक दिवस संध्याकाळी मी माझा दवाखाना उघडला आणि एक आजी तावातावाने आत आल्या. केस विस्कटलेले, साडी कशीतरी गुंडाळलेली, कपाळावर आठ्या, चेहऱ्यावर प्रचंड राग, एक हात कमरेवर आणि दुसऱ्या हाताने माझ्याकडे बोट दाखवत जोरात ओरडून त्या सांगायला लागल्या,"काय हो तुमचं क्लिनिक सारख बंद असतं, किती वेळा येऊन गेले मी!!"😳
पूर्वीची मी नक्कीच घाबरले असते, अस्वस्थ झाले असते पण आता शांतपणे मी त्यांना विचारलं," काय होतंय तुम्हाला आजी?" त्यांनी माझ्यासमोर त्यांच्या सगळ्या समस्यांची मोठी यादी केली..
वर हेही सांगितलं मी माझं क्लिनिक कधीच उघड नसल्यामुळे त्यांना दुसर्या डॉक्टरकडे जावं लागलं..😮
खूप कमी वेळा असं होतं की क्लिनिकच्या वेळेला पेशंट येऊन गेले आहेत आणि क्लिनिक बंद आहे. बऱ्याचदा लोक कोणत्याही वेळेला येतात आणि क्लिनिक बंदच असल्याच्या तक्रारी करत राहतात..
नवीन पेशंट जेंव्हा डॉक्टरकडे येतात तेंव्हा बर्याचदा डॉक्टरांना अंदाज येऊन जातो की याच्यापुढे काय होणार आहे, पेशंट परत येणार आहे, पैशांसाठी त्रास देणारे, डॉक्टरांचं सगळे ऐकणारे की त्रासदायक ठरणार आहे.🤫🤭
तर, या आजींना उपचार देण्यासाठी मी थोडीशी नाखूष होते. त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले दिसत होते. त्या भयंकर दादागिरी करत, माझ्यावर वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करत होत्या.त्यांचे दुसरीकडे उपचार देखील चालू होते आणि माझ्यावर त्यांचा अजिबात विश्वास दिसत नव्हता. त्या मला त्रास देणार आहे हे मला कळत होतं.😓
दोन-तीन दिवस विचार करून हो-नाही करत आजींनी माझ्याकडे उपचार घ्यायचे ठरले. त्यांची सविस्तर केस हिस्टरी घेताना डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या तक्रारी आजींनी सांगितल्या. तपासण्या, प्रिस्क्रीप्शनच्या मोठ्या फाईली, आयुर्वेदिक औषधांचा ढिग सगळंच माझ्या टेबलवर आलं. एवढी औषध मी पण त्यांना द्यावी असा त्यांचा हट्ट होता. याशिवाय मला बोट दाखवत जोरजोरात विचारत होत्या," जमणारे का तुम्हाला?"
आजींना मानसिक आजार होता. त्यामुळे सतत भीती असायची की मला काहीतरी भयंकर आजार झालाय आणि मी कधीच बरी होणार नाही..
हा एक प्रकारचा मनोकायिक विकार होता. मानसिक अस्वस्थतेचा शरीरावर परिणाम झाला होता, त्यामुळे डोक्यात काहीपण पक्या कल्पना होत्या.
-पाणी पिलं की डोकं दुखणार
-नवीन काही अन्न खाल्लं की पोट दुखणार
-एका हाताच्या नसा दुसऱ्या हाताच्या नसेपेक्षा वेगळ्या आहेत इ. इ.
त्यांच्या केसचा नीट अभ्यास करून योग्य होमिओपॅथिक औषध त्यांना दिलं. त्यांचा आजारच असा होता की बरं व्हायला बराच वेळ लागणार होता, पण आजींना अजिबात वाट बघायची नव्हती. आठवड्याचे औषध दिले तरी त्या अधूनमधून येतच राहायच्या. त्या म्हणायच्या तुम्ही औषधच कमी देत आहे..😯
कधी खात्री करायला यायच्या "नक्की बरी होणार आहे का मी?" तर कधी म्हणायचं ,"तुम्ही इथे जे औषध देतात ते घरी देत नाही, इथे औषध घेतलं की बरं वाटतं. घरी गेल्यावर काही उपयोग नाही..!" त्यांच्या पक्क डोक्यात बसलं होतं की जास्त प्रमाणात औषध घेतलं की आपण बर होणार, त्यामुळे सारखं सारखं येऊन कधी दादागिरी करत, कधी केविलवाणे चेहेरे करत त्या जास्त औषध मागतच राहायच्या. "लक्षात आहे ना मला काय काय होतय ते ?? ,जमणार ना तुम्हाला इत्यादी"
आजींनी या आधीच माझ्या मागे लागून फीस कमी करून घेतली होती. त्यांच्या मुलीने पण त्यांच्या स्वभावाची कल्पना मला दिली होती. त्यांना खरंतर औषधाने फरक पडत होता, पण त्या मान्य करायला अजिबात तयार नव्हत्या. सारख्या येऊन माझ्याशी भांडायच्या. मी खूप धीराने समजावत होते, त्यांच्या अगदी वायफळ शंकांचं निरसन करत होते पण मग मात्र माझ्यासाठी ही ते अति व्हायला लागलं.🤨
रोज संध्याकाळी मी क्लिनिक उघडलं की आजी आत शिरून काहीतरी फुटकळ शंका विचारायच्या किंवा जास्त औषध मागण्यासाठी तक्रारी वाढवून सांगायच्या. सकाळच्या वेळी फोन करायच्या. मी त्यांना पालकची भाजी पचनासाठी खायला सांगितली तर त्या पालक विकत घेऊन मला दाखवायला क्लिनिक मध्ये आल्या..🙄🙄
रोज यायचं आणि कुठली तरी वस्तू विसरून जायचं मग घ्यायला परत यायचं आणि तक्रारी सांगत राहायचं!!
एक दिवस मी त्यांना सांगितलं आत्ता मी त्यांच्याशी बोलणार नाहीये कारण आदल्यादिवशीच औषध दिले आहे.. तर मग त्यांचा फोन घेऊन त्या आल्या, "माझा फोन बिघडला आहे, मला उचलता येत नाहीये प्लीज माझी मदत करा..!!"
माझी खूप चिडचिड व्हायला लागली.😠
बाकी रुग्णांच्या मध्येमध्ये येऊन त्यांचं काही ना काही चालू असायचं. माझी क्लिनिक मधली प्रायव्हसी संपुष्टात आली. पेशंट नसतानाचा तो माझा वेळ वाचन-लेखन अभ्यासाचा होता तो मिळेचना 😓
खुर्चीवर मांडी घालून मुक्काम ठोकायचा आणि आणि तक्रारी चालू करायच्या😅
आठवड्याची छोटीशी फीस दिली की त्यांना वाटायचं की आपण डॉक्टरचा वेळच विकत घेतला आहे, कधीही आलं तरी चालेल..🙁
यावर ठाम उपाय करणे जरुरी होते. मी त्यांच्या मुलीला फोन केला तिला सांगितलं की त्यांना एकट्याने पाठवू नका. तुम्ही पण बरोबर या. हे कळाल्यावर आजी मला सारखे फोन करायला लागल्या. फोन उचलले नाही तर स्वतः क्लिनिक मध्ये आल्या. वर्चस्व गाजवणाऱ्या, दादागिरी करणाऱ्या आजी हात जोडून माझी माफी मागू लागल्या. त्यांना हे असं बघून खूप वाईट वाटत होतं पण आपण सहन करत राहिलो तर लोक असेही त्रास देऊ शकता हे ही तितकच खरं!!🤨
त्यांच्या मुलीच्या समोर परत त्यांचे समुपदेशन केलं. त्यांचा वेळ चांगल्या प्रकारे कसा घालवता येईल, मानसिक दृष्ट्या त्यांना व्यस्त कसं राहता येईल यावरही सल्ला दिला, परत एकदा!
त्यांना सांगितलं की आठवड्यातून एकदाच येऊन औषध घेऊन जायचं. अधे-मध्ये यायचं नाही. या रस्त्यावर फिरायला देखील यायचं नाही कारण मग त्या बाहेरून माझ्याकडे बघत रहायच्या. जुन्या गोष्टींची पुनरावृत्ती झाली तर मी उपचार करणार नाही. यानंतर मात्र आजी शांत झाल्या. रडत रडत तुमच ऐकेन असे म्हणाल्या.
हळूहळू त्यांच्यात बराच फरक पडला. आता त्या आठवड्यातून एकदाच येतात आणि सांगितलेलं नीट ऐकतात.त्यांना झोप शांत लागते.भूकही लागते.त्यांच्या बर्याच तक्रारी कमी झाल्या आहेत. पचनही सुधारलं आहे. मुख्य म्हणजे कपाळावरच्या आठ्या कमी झाल्या आहेत आणि अधूनमधून एक गोड हास्य त्यांच्या चेहऱ्यावर येत आहे.😁😇
डॉ.जुईली कुलकर्णी
श्री होमिओपॅथिक क्लिनिक
रावेत पुणे
9766902124