
03/01/2023
*सावित्रीबाईंचे ऋण*
मध्यंतरी काही दिवसांपुर्वी अफगाणिस्तान मधुन आलेली एक बातमी वाचली होती. तालीबान ने अफगाणीस्तान मध्ये स्त्रियांना उच्चशिक्षण म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी बंदी घातल्याची ती बातमी ऐकून चीड, राग आणि शहारे आले होते..
धर्माच्या नावाखाली आणखी किती शतके ही मानसिकता स्त्रियांना वेठीस धरणार आहे ह्याची चीड होती, मुलभूत हक्क नाकारणाऱ्या मानसिकतेचा राग आला होता.. त्याचवेळी एका कागदावर एका अफगाण युवतीने लिहिलेले वाक्य वाचुन अंगावर शहारा आला होता. ते वाक्य त्या अनामिकेने बहुतेक एका प्रश्नपत्रिकेखाली लिहिलेलं होतं, "I wish I wasn't be in Afghanistan "आणि सोबत ही emoji ☹️ आहे..
आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे किती मोठे आहे याची जाणीव त्या क्षणी मनात दाटून आली..आज सरकारच्या पातळीवर तरी शिक्षणाच्या बाबतीत स्त्री पुरुष समानता आहे.. तो मुलभूत हक्क मानला आहे.. स्त्रिया जेंव्हा वेगळी वाट चोखाळत एखाद्या निराळ्या क्षेत्रात प्रगती करतात तेंव्हा आजच्या समाजाकडून त्यांचे कौतुकच होते..
पण भारतात, आपल्या महाराष्ट्रात साधारणपणे दीडशे वर्षांपूर्वी शिक्षणाच्या बाबतीत काहीशी अफगाणिस्तान सारखीच परिस्थिती होती.स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नव्हताच.. त्यामुळे शिक्षणाच्या जोरावर उघडली जाणारी अनेक कवाडं तिच्यासाठी बंदच होती..
ही स्थिती बदलण्यासाठी जाणीवपूर्वक विचारपरिवर्तन, समाज परिवर्तन घडवून आणावे लागले..आज स्त्री शिक्षणाच्या बाबतीत जी सुधारणा, प्रगती आपल्याकडे दिसते आहे, ही त्या जाणीवपूर्वक घडवून आणलेल्या परिवर्तनाचीच रसाळ फळे आहेत..
महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरु केली आणि ती सावित्रीबाई फुले यांनी चालवली.. त्यावेळी या उभयताना समाजाकडून प्रचंड अपमान, उपेक्षा आणि निर्दयी त्रास सहन करावा लागला होता.. अंगावर चिखल उडवणे, दगड मारणे या गोष्टी तर नित्याच्याच होत्या. पण समाजाच्या टिकेला, निंदेला न घाबरता आपले स्त्री शिक्षणाचे काम त्यांनी सुरूच ठेवले. आगरकर देखील या स्त्री शिक्षणाच्या चळवळीत होते..आगरकरांना देखील स्त्री शिक्षणाच्या कामामुळे अनेकदा उपास घडला होता, निंदा सहन करावी लागली होती.. पण त्यांनी धाडस, कष्ट, प्रयत्न केले, समाजातील प्रस्थापित कायद्याच्या विरोधात काम केले म्हणून स्त्रिया शिकू लागल्या आणि आज स्त्री ही सबळ झाली.
आज सावित्रीबाई फुले यांची जयंती..
आपल्या आजच्या स्वातंत्र्याची खरी किंमत त्यांनी चुकवली होती..आजचे स्वातंत्र्य उपभोगताना त्यांना आठवूयाच..मनापासून त्यांना नमन करुया..
सावित्रीचे हे देणं आपण द्यायलाच हवं!!
आज त्यांना आठवायलाच हवं!!
(अफगाणिस्तान मध्येही असेच सावित्रीबाई, जोतिबा फुले आणि आगरकर जन्माला येतील आणि तिथलीही स्त्री शिक्षण घेऊन स्वतंत्र होईल हीच आशा बाळगूया )
*मधुकिशोर*
(डॉ. माधवी किशोर ठाणेकर )
३ जानेवारी २०२३