21/04/2026
ऑनलाइन गेमिंग आणि वाढती आत्महत्येची समस्या ; एक गंभीर इशारा
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर हळींगळे,
निर्मल हॉस्पिटल, मिरज
मिरज: ता: २१ दोन दिवसापूर्वी न्यूज पेपरमध्ये एका २२ वर्षीय तरुणाने ऑनलाईन गेममुळे आत्महत्या केल्याची न्यूज आली होती. अश्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडलेल्या आपण वाचतो, पाहतो. सध्याची तरुणपिढी सोशल मिडिया वापरामुळे भरकटलेली पाहायला मिळत आहे. अशीच एक केस आमच्या हॉस्पिटलमध्ये आली होती. मोबाईल व्यसन सोडवा म्हणून एक पालक आमच्याकडे आले होते. मुलगा कोणाचं ऐकत नाही,खात नाही, नीट झोपत नाही, बाहेर खेळायला जात नाही, सतत तणावात असतो बोलत नाही पण मोबाईल सतत वापरतो. अशी समस्या घेऊन ते आले होते. त्या मुलाला वेळेत ट्रीटमेंट सुरु केली. तो आता हळूहळू या व्यसनातून बाहेर येत आहे. पण गेममुळे आत्महत्या झाल्याच्या घटनेने अनेक पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. खरंतर ऑनलाइन गेमिंग आणि वाढती आत्महत्येची समस्या हा एक गंभीर इशाराच म्हणावा लागेल. अश्या समस्या तुम्हाला भेडसावत असतील तर यावर उपाय काय करावा याविषयी आज जाणून घेऊया.
आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन गेमिंग हे केवळ मनोरंजनाचं साधन राहिलेलं नाही, तर अनेक मुलं आणि तरुणांसाठी ते व्यसन (Addiction) बनत चाललं आहे. मोबाईल, इंटरनेट आणि स्वस्त डेटा यामुळे गेम्स सहज उपलब्ध झाले आहेत. सुरुवातीला “टाइमपास” म्हणून सुरू झालेली सवय हळूहळू इतकी वाढते की ती मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू लागते.
ऑनलाइन गेमिंगमुळे काही धक्कादायक घटना घडल्याच्या आपण नेहमीच वाचतो, बघतो. काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील एका १७ वर्षांच्या मुलाने गेममध्ये सतत हरल्यामुळे आणि मित्रांकडून चिडवल्यामुळे तीव्र तणावात जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तो दिवसातून ८-१० तास गेम खेळत होता.
दुसऱ्या एका प्रकरणात, १५ वर्षांच्या मुलाने गेममधील खरेदीसाठी पालकांच्या खात्यातून मोठी रक्कम खर्च केली. पालकांनी रागावल्यानंतर त्याने टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. अशी एक ना अनेक उदाहरणे आपण रोज पाहतो, ऐकत असतो. काही वेळा पालकांनी मोबाईल काढून घेतल्यामुळेही मुलांमध्ये राग, आक्रमकता आणि स्वतःला इजा करण्याची प्रवृत्ती दिसून येते. या सगळ्या गोष्टींमुळे स्पष्ट होतं की, ऑनलाइन गेमिंगचा अतिरेक मानसिक तणाव, डिप्रेशन, अँझायटी, झोपेचा अभाव आणि एकटेपणा वाढवतो. मुलं हळूहळू वास्तव जीवनापासून दूर जाऊ लागतात आणि त्यांच्या भावनांवर नियंत्रण कमी होतं.
भारतामध्ये तर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ८० कोटींहून अधिक आहे. त्यापैकी मोठा वर्ग गेमिंगमध्ये सक्रिय आहे. विविध अहवालांनुसार, १८ ते ३० वयोगटातील युवकांमध्ये ऑनलाइन गेमिंगचे व्यसन झपाट्याने वाढत आहे.काही अभ्यासांमध्ये असे दिसते की १०-१५% युवकांमध्ये “Gaming Disorder” ची लक्षणे दिसतात, जी मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. हे चिंताजनक वास्तव आहे.
या समस्येवर योग्य वेळी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे.स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणे, मुलांशी मोकळा संवाद ठेवणे, पर्यायी उपक्रम (खेळ, छंद) वाढवणे,
वर्तनातील बदल ओळखून वेळेत हस्तक्षेप करणे आणि गरज असल्यास तज्ज्ञांचे समुपदेशन (counseling) घेणे गरजेचे असते. ऑनलाइन गेमिंगचं व्यसन हे गंभीर मानसिक आरोग्य समस्या बनू शकतं. पालकांनी मुलांना ओरडण्याऐवजी समजून घेतलं पाहिजे. योग्य वेळी समुपदेशन आणि उपचार घेतल्यास या समस्येवर नियंत्रण मिळवता येतं असा सल्ला मी नेहमी पालकांना देतो.
ऑनलाइन गेमिंग स्वतःमध्ये चुकीचं नाही, पण त्याचा अतिरेक अत्यंत धोकादायक ठरू शकतो. आज गरज आहे ती जागरूकतेची, संवादाची आणि योग्य वेळी उपचारांची. लक्षात ठेवा गेममध्ये हरलात तर पुन्हा खेळू शकता पण आयुष्य हरलात तर संधी मिळणार नाही.तुम्ही जर अश्या समस्येमधून जात असाल तर एकदा निर्मल हॉस्पिटलला भेट द्या.
📍 अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा:
📍 निर्मल हॉस्पिटल, स्टेशन रोड, मिरज
📞 9922646566 | 9028081339 | 9088444546
#मानसिकआरोग्य #मानसिकआरोग्यजागरूकता #गेमिंगव्यसन #ऑनलाईनगेमिंग #तरुणांचेमानसिकआरोग्य #युवाजागरूकता #पालकजागरूकता #स्क्रीनटाइम #व्यसनमुक्ती