04/10/2021
*ECG..*
“डाॅक्टर पॅसेंजर खोळंबलयं थोडी घाईये,खांदा दुखतोय एक इंजेक्शन देऊन टाका” म्हणत एक मध्यमवयीन गृहस्थ मध्यंतरी ओपिडीत आले होते..बीपी चेक केलं तर २१०/१००..
प्रोटोकाॅल नुसार ‘ईसिजी’ करूया असं सुचवलं तर,”मी रिक्षा चालवतो त्यामुळं रिक्षा सुरू करतांना खांद्यावर जोर येतो म्हणून दुखतं..मला बीपीबिपी काय नाय” म्हणत त्यांनी ईसिजीला नकार देत तिथनं काढता पाय घेतला..
दुसऱ्या दिवशी चक्कर येत असलेली एक मुलगी ओपिडीत आली..आधीच रक्तक्षय त्यात तिचे बाबा पहाटेच गेल्यानं मानसिक अस्वास्थ्यामुळं ती मुर्छित झाल्यानं तिचे नातलग तिला घेऊन आले होते..
थोडी माहिती घेतल्यानंतर कळलं काल तिच्या बाबांनी मेडिकलमधनं ‘पेनकिलर’ घेतलं होतं,दुखणं राहिलं दूर पण पहाटे हार्ट अटॅक आला अन् ते गेले..
हे तेच गृहस्थ होते ज्यांनी ईसिजीला नकार दिला होता..
ईसिजी केला असता तर काहीच झालं नसतं असं नाही पण किमान ‘निदान’ झालं असतं-दिशा मिळाली असती..अश्या पद्धतीच्या विकारात महत्वाचे असणारे ‘गोल्डन अवर्स’ असे हकनाक वाया गेले नसते..
‘अस्वस्थ वाटत छातीत दुखलं’ आणि डाॅक्टरनं तुमच्या छातीवर इलेक्ट्रोड ठेवून तुमच्या हृदयाचा एकेक ठोका-एकेक हालचाल कागदावर उतरवून तुम्हाला दाखवला तेव्हा खरं तर तुम्ही डाॅक्टरांआधी ‘विल्येम ऐंथोवेन’ यांचे आभार मानले पाहिजेत ज्यांनी ‘ईसिजी’चा शोध लावलाय..
शेकडो वर्ष झालीत तरी आजही ‘हृदयरोग म्हटलं की आधी ईसिजी’ हे समीकरण जगभरात कायम आहे..
चला आज ‘विल्येम आणि ईसिजी’ यांचीच गोष्ट सांगतो..
सहा भावंडात तिसरा असलेल्या विल्येमचा जन्म इंडोनेशियातल्या जावा बेटावरच्या सेमॅरंग इथं झाला..
त्याचे वडील जेकब हे सैन्यात वैद्यकिय अधिकारी तर आईही श्रीमंताघरची लेक होती..
वडलांच्या पावलावर पाऊल ठेवून विल्येमनं आपलं वैद्यकिय शिक्षण पुर्ण तर केलं पण हे पाणी काही वेगळंच होतं..
आधी नेत्रचिकित्सकासह नंतर शरिररचनाशास्त्राच्या प्राध्यापकासोबत काम करत कधी अभ्यास,कधी संशोधन,
कधी व्यवसाय तर कधी अध्यापन करतांना तो सगळीकडं तन्मयतेनं रमला..
प्रचंड प्रतिभा असली तरी काम चौखूर वारू उधळल्यागत असल्यानं त्याला दिशा नव्हती पण त्यानं आपलं संपुर्ण लक्ष्य एक ‘उपकरण’ बनवण्यासाठी केंद्रित केलं आणि इतिहास घडला..
खरं तर विल्येमला ही कल्पना ऑगस्टस वाॅलर या ब्रिटिश डाॅक्टरनं बनवलेलं एक उपकरण बघून सुचली..
हे उपकरण ‘कॅपिलरी इलेक्ट्रोमीटर’ प्रणालीवर आधारित होतं..
यात पारा आणि सल्फ्युरिक गॅस भरलेल्या पातळ नलिकांच्या मदतीनं हृदयातल्या हालचाली टिपता येत..
वाॅलरचा जुगाड जुळून आला असला तरी त्याच्या रिडींगमध्ये अचुकता नव्हती..
हृदयासारख्या महत्वाच्या अवयवाबाबत दिरंगाई नको म्हणून विल्येमनं ‘आपलं’ उपकरण विकसित करायला सुरूवात केली आणि ‘तार जलविद्युतमापक यंत्र’ अर्थात स्ट्रिंग गॅल्वनोमीटर बनवलं..
या यंत्रात चांदीचा मुलामा दिलेला नाजूक काचमणी हृदयातील हालचाली नोंदवत असे..
हा काचमणी दोन विद्युतचुंबकातून जात असल्यानं हृदयातील सुक्ष्म हालचालीही टिपायचा..
विल्येमचं हे उपकरण तांत्रिकदृष्ट्या प्रचंड यशस्वी ठरलं इतकं की अगदी आजचे डिजिटल-अत्याधुनिक उपकरण त्यांच्यापुढं फिके पडावेत..
१८९२ साली विल्येमनं पहिल्यांदाच या उपकरणाचा वैद्यकिय वापर केला..
ईसिजीचं आरेखन एक विशिष्ट आकाराचा तरंग दाखवत होता ज्यामध्ये हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात तिन शिखरं आणि दोन खड्डे दिसत होते..
विल्येमनं यांना नावं दिली P Q R S T..हीच नावं अगदी आजही वापरली जातात..
आजच्या ‘मानक’ ईसिजीत सहा इलेक्ट्रोड्स छातीवर आणि उर्वरित चार घोट्याजवळ आणि मनगटाजवळ लावले जातात..
पेशंटला सरळ पाठीवर झोपवून डोकं आणि छाती हलकी वर उचलली जाते..
या आरामदायक स्थितीत हृदयाच्या पेशी ध्रुवीकृत असतात म्हणजेच पेशीतल्या आणि पेशीबाहेरच्या हालचालीत असुंतलन असतं..
हृदयाचा ठोका जेव्हा पडतो तेव्हा हृदयात नैसर्गिक विद्युतप्रवाह संचलित होतो,पेशीच्या आवरणातील वाहिन्या मोकळ्या होत सोडियम आयर्न आत जाऊन पेशीच धृवीकरण होत स्नायू आकुंचित होतात आणि वाहिन्या बंद होऊन चेता आणि स्नायू यांच्या प्रस्थानकावर चेताप्रेरणा आल्यामुळं नाहीसा झालेला विद्युतभार पुन्हा निर्माण होतो..
ईसिजीच्या आरेखनामध्ये दिसणाऱ्या हृदयाच्या ठोक्यात आधी छोटं शिखर दिसतं ते म्हणजे तरंग ‘P’ हे हृदयाच्या वरच्या कप्प्यातलं धृवीकरण..
छोटाले कप्पे हृदयाच्या वरच्या बाजूला असतात..
या नंतर हे आरेखन मोठं शिखर आणि पाठोपाठ छोटीशी दरी दर्शवतो याला ‘QRS complex’ असं म्हणतात..
हे हृदयातील मोठ्या कप्प्यांचं धृवीकरण पुर्ण करतात..
सरतेशेवटी येतं ‘अधो विक्षेपण’ अर्थात अपवर्ड डिफ्लेक्शन ज्याला म्हणतात तरंग T..हे धृवीकरण झालेल्या पेशींना पुर्वस्थितीत येण्याचं द्योतक..
ईसिजीचं आरेखन डाॅक्टरांना पेशंटच्या हृदयाची स्थिती समजावून घेण्यास मदत करतं..
मोठा QRS तरंग हृदयाच्या भिंतींना सूज असल्याचं दर्शवते ज्याला हृदयजन्य अतिवृद्धी असं म्हणतात..
विलक्षण मोठा किंवा छोटा ‘QT अवकाश’ हा हृदयाची अस्वाभाविक लय आणि अचानक हृदयविकाराचा झटका यांचा निदर्शक असतो..
जर ‘ST’ विभाग उंचावला असेल तर हे थेट हार्ट अटॅकचे संकेत..
ईसिजी अर्थात इलेक्ट्रोकार्डिओग्रामला त्याच्या मुळ डच शैलीमुळं ईकेजीही म्हटलं जातं..
विल्येम हृदयरोगाचं वैद्यकिय निदान होण्यासाठी ईसिजीच्या वापराबाबत प्रचंड आश्वस्त होता..
त्यानं केवळ उपकरण शोधलं असं नाही तर निरोगी आणि हृदयरोगी यांचे निरोगी आणि आजारी अवस्थेतले ईसिजी काढून मार्गदर्शक ठरतील अश्या नमुन्यांचं वर्गीकरणही केलं..
हृदयाची लय हरवणं-धमणीकाठिण्य-सूज-थेट हार्ट अटॅक अश्या एक ना अनेक अवस्थांचं निदान ईसिजीमुळं विक्रमी वेळात होऊ लागलं..
प्रारंभी वैद्यकजगतात ‘विल्येम आणि ईसिजी’ या दोघांबाबत संशय होता पण १९२४साली या शोधासाठी विल्येमला ‘नोबेल’ जाहिर झालं आणि सगळी जळमटं दूर झाली..
अर्थात विल्येमच्या ईसिजी उपकरणामध्ये कालौघात अनेक बदल झाले..
तत्कालिन उपकरण तापल्यानंतर पाण्यानं थंड करावं लागायचं ज्याचं वजन तीनशे किलोपर्यंतही असायचं अन् आकार जवळपास एखाद्या खोलीइतका असायचा..
अलिकडं ॲपल कंपनीनं हातातल्या स्मार्टवाॅचमधे ईसिजीचं ॲप्लिकेशन बाजारात आणलं,ज्यात ४ते ३० सेकंदाच्या आत ईसीजी निघू शकतो..
एफडीएनं अश्या उपकरणांना दुसऱ्या वर्गाचा दर्जा दिला असला तरी वैद्यकिय क्षेत्रात नैदानिक पातळीवर यांना अद्यापही तशी स्विकृती नाही..
आजमितीसही ईसीजी हृदयरोगनिदानाला पुरक अशी महत्वाची चाचणी आहे..
थोडक्यात ईसिजी म्हणजे काय? तर “अत्यंत सुलभतेनं काही क्षणात आपलं हृदय दाखवणारी खिडकी”
वैद्यकशास्त्राला पर्यायी मानवी समुहाला ‘ईसिजी’ ही अत्यंत महत्वाची ‘देण’ देणाऱ्या विल्येम ऐंथोवोन यांचा आज स्मृतीदिन..विनम्र अभिवादन💐
🙏🏻🙏🏻🙏🏻