30/09/2017
आज विजयादशमी..दसरा.. बरोबर ४ वर्षांपूर्वी याच दिवसाचे औचित्य साधून “जाधव न्युरोसर्जीकल केअर सेंटर" ची सुरुवात केली होती. २०१२ साली शिक्षण संपवून जेंव्हा मी सांगलीमध्ये आलो होतो त्यावेळी माझ्या बँक अकौंटकडे पाहून जर कोणी म्हणालं असतं ना कि मदन तू एका वर्षात स्वतःचं सुसज्ज असं न्युरोसर्जरीचं हॉस्पिटल सुरु करशील, तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. बहिण कविता आणि घरातील इतर सदस्य यांच्या आशीर्वादाने आणि इतर सर्व बँका लोन देण्यासाठी नकार देत असताना केवळ माझ्या ज्ञानावर विश्वास ठेऊन मला लोन देणारे बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर श्री. नंदेश्वर यांच्या सहकार्याने या हॉस्पिटलचं स्वप्न साकार झालं. हि चार वर्षे कशी भुर्र करीत निघून गेली कळालंही नाही. परंतु आज ती चार वर्षे पुन्हा जिवंत होत आहेत आठवणींमध्ये.
क्रिटिकल अवस्थेत admit केलेले ते पेशंट्स, त्यांच्या नातेवाईकांच्या त्या भांबावलेल्या नजरा, ती मेंदूची किचकट ऑपरेशन्स, त्या नंतरची आयसीयू मधील माझी व माझ्या सहकार्यांची धावाधाव, ती रात्रीची जागरणे, वेळ प्रसंगी काही दारु पिलेल्या पेशंट्सकडून खाल्लेल्या त्या शिव्या... मग हळूहळू त्यांच्या प्रकृतीमध्ये पडलेला तो सकारात्मक फरक, त्याबरोबर नातेवाईकांच्या नजरेत झालेला होकारात्मक बदल... आणि सरतेशेवटी डिस्चार्ज दिला जाताना पाणवलेले त्यांचे डोळे आणि नको नको म्हणताना वयाने बुजर्ग असणार्यांनी माझ्या पायांना लावलेले त्यांचे हात... आणि महिन्या-दोन महिन्यानंतर फॉलो-अपला येताना त्यांच्या खिश्यात ठेवलेला माझा फोटो (जो त्यांनी माझ्या फेबु किंवा whatsapp वरून डाउनलोड करून प्रिंट केलेला असतो) आणि क्वचित प्रसंगी त्यांच्या देव्हार्यात, प्रत्यक्ष परमेश्वराच्या जवळ ठेवला गेलेला माझा फोटो... सगळं कसं नजरेसमोरून पळत जातंय, जाताना माझ्या चेहऱ्यावर एक हास्य आणतंय आणि मनात ‘अजून काहीतरी’ करून दाखविण्याची जिद्द निर्माण करतंय.. काही वेळा अपार कष्टांना यशाने दिलेली हुलकावणी मनाला चटकाही लावून गेली. वाटायचं, आपल्या राबण्याला किंमत नाही. कारण आपल्या हातात काहीच नाही. परंतु मग अशा वेळी बरोबर, मागचा एखादा 'यशस्वी'रित्या घरी पाठविलेला पेशंट ओपीडी मध्ये भेटायला यायचा नी गेलेला उत्साह परत मिळवून द्यायचा..
आज या प्रसंगी एक दुसरी आठवण प्रकर्षाने येतीय. माझ्या एका गुरुतुल्य डॉक्टरांनी मला एक मेसेज पाठविला होता मध्ये एकदा माझ्या मित्राकडून.. ”मदन ‘सिस्टीम’मध्ये राहून काम करत नाही..”
आज या ‘सिस्टीम’बाहेरील खासगी प्रॅक्टिस करण्याला ४ वर्षे पूर्ण झाली.. या निमित्त माझ्या आईचे, पत्नीचे, बहिण भावाचे व सर्व कुटंब सदस्यांचे, तसेच माझ्या गुरुजनांचे, माझ्या सहकारी डॉक्टर मित्रांचे, हॉस्पिटलमधील माझ्या सहकाऱ्यांचे,... आणि सरतेशेवटी, माझ्यावर विश्वास ठेऊन स्वतःचा जीव वाचविण्याची जबाबदारी मला सोपविणाऱ्या त्या सर्व रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे मी कोटी कोटी आभार मानतो...
...डॉ. मदन भिमसेन जाधव.