06/02/2025
दिव्यत्वाची प्रचिती
🙏🏽🙏🏽🙏🏽
पद्मश्री डॉ. विजयालक्ष्मी देशमाने !!
कॅन्सरतज्ज्ञ डॉ विजयालक्ष्मी देशमाने, जेवारगी तालुक्यातील कोबल या गावात जन्मल्या (कलबुर्गी जिल्हा) ज्यांनी आपल्या पालकांची गरिबी आणि निरक्षरता एक आव्हान म्हणून स्वीकारली आणि त्या आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचल्या. त्यांना या वर्षी जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आपण अनेक वेळा डॉक्टरांच्या वाढत्या फीस वर तक्रारी ऐकतो. खरं तर, आपल्यापैकी बहुतेक लोक वैद्यकीय क्षेत्रावर प्रश्न उपस्थित करतात, जे "उद्योग" (Industry) बनले आहे, जिथे रुग्णांचे आरोग्य हा प्राथमिक मुद्दा राहिलेला नाही आणि "वार्षिक नफा" हा केंद्रबिंदू झाला आहे. पण नेहमी काही अपवाद असतात, आणि ही एक अशीच गोष्ट आहे. ही एक स्त्री आहे जिने झोपडपट्टीत राहण्यापासून, भाजी विकण्यापासून, शस्त्रक्रिया करत कर्करोग तज्ञ होण्यापर्यंतचा प्रवास केला. स्वतः विवाह न करता, बंगलोरच्या प्रतिष्ठित किडवाय रुग्णालयात कर्करोग विभागाच्या प्रमुख आणि संचालक म्हणून काम केले. भारतातील एक प्रतिष्ठित कर्करोग तज्ञ, कर्नाटका कॅन्सर सोसायटीच्या उपाध्यक्ष आणि अनेक पुरस्कार प्राप्त डॉ. विजयलक्ष्मी देशमाने यांची ही कहाणी. डॉ. विजयलक्ष्मी देशमाने यांचा जन्म १९५५ मध्ये झाला आणि त्या गुलबर्गा शहरातील नातिकेरी झोपडपट्टीत वाढल्या. त्यांनी १९८० मध्ये कर्नाटका मेडिकल कॉलेज, हुबली येथून MBBS पूर्ण केलं आणि १९८३ मध्ये बेल्लारीमध्ये MS केलं. त्यांच्या आई, रत्नम्मा, भाजीपाला विकणारी होत्या आणि त्यांचे वडील, बाबुराव देशमाने, भारतीय स्वातंत्र्य चळवळीने प्रभावित होते, MSK मिलमध्ये काम करत होते.
डॉ. विजयलक्ष्मी यांची सहा बहिणी आणि एक भाऊ आहेत. ते अत्यंत दारिद्र्यात वाढले, लहानपणी त्या आईला भाजी विकण्यात मदत करत असत. आज, त्यांचा भाऊ अजॉय घोष वकील आहे आणि त्यांच्या बहिणी- समता, जागृती, नागरथ्ना, आणि जयश्री सर्व पी.एच.डी. धारक आहेत! सर्वांनीच त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्टता साधली आहे. डॉ. विजयलक्ष्मी देशमाने यांना भारतातील प्रमुख कर्करोग तज्ञ मानलं जातं, त्यांच्या नावावर अनेक यशस्वी शस्त्रक्रिया आणि अनेक जाणीव जागृती शिबिरे आहेत.
डॉ. विजयलक्ष्मी यांनी किडवाय इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर, बंगलोरमध्ये काम केलं, तेथे पदोन्नती मिळवली आणि कर्करोग विभागाच्या प्रमुखपदी निवृत्त झाल्या. त्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये देखील काम केले. १९९३ मध्ये त्यांना FAIS (फेलोशिप ऑफ असोसिएशन ऑफ इंडियन सर्जन्स) फेलोशिप प्राप्त झाली. त्यांना राष्ट्रीय रत्न, शिरोमणी राष्ट्रीय पुरस्कार, इंटरनॅशनल स्टडी सर्कलद्वारे सुवर्ण पदक, अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्यूट, यूएसए कडून 'वुमन ऑफ द ईयर' पुरस्कार, कर्करोगाच्या क्षेत्रात उत्कृष्ट सेवेसाठी रोटरी ग्रुपकडून कलश पुरस्कार, आणि राज्योत्सव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. विजयलक्ष्मी देशमानेंनी एका कन्नड मासिकला दिलेल्या इंटरव्यू चं हे मराठी भाषांतर:
"मी एका मागासलेल्या जातीतील येणारी आहे, मी चप्पल शिवायची, नवीन चपला नाही, तर जुन्या चपला. माझे वडील बाबुराव हे स्वातंत्र्य चळवळीने प्रेरित होते आणि सर्वांच्या सक्षमीकरणावर ते विश्वास ठेवत होते. जरी ते औपचारिकपणे शिकलेले नव्हते, तरी त्यांनी जातीच्या व्यावसायिक कडेला तोडून ते स्वतः लेखन शिकले - कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्रजी. मी १९५५ मध्ये जन्मले, त्यानंतर एक भाऊ आणि ६ बहिणी होत्या. आम्ही दहा जण एका झोपडपट्टीत राहत होतो."
"एक वेळ जेवण मिळवणं हेच एक मोठं आव्हान होते. माझ्या पालकांनी विविध कष्टाच्या कामांचा पाठपुरावा केला - हमाली, लाकूड कापणे, आणणे आणि विकणे इत्यादी. नंतर, वडिलांनी मिलमध्ये काम सुरू केलं आणि लोकांशी चांगली जुळवाजुळव करण्याच्या त्यांच्या कुवतीमुळे ते चांगल्या पदावर पोहोचले. सगळे त्यांना "देशमान्य" म्हणून हसून म्हटत असंत आणि त्यांनी त्यांचं जात नाव बदलून तेच घेतलं. माझं नाव विजयलक्ष्मी पंडीत यांच्यावर ठेवण्यात आलं, ज्या पं. नेहरूंच्या बहिण होत्या आणि यू.एन. महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या, आणि त्यानंतर "देशमाने" हे आडनाव झालं – देशमान्यांची मुलगी!"
"माझ्या वडिलांच एक स्वप्न होतं की मला आरोग्य क्षेत्रात पाठवायचं आणि गरीबांना सेवा देणं. झोपडपट्टीत असतानाही असे स्वप्न पाहणं खरंच आश्चर्यकारक होतं आणि झोपडपट्टीतील मुलीला शाळेत पाठवणं हे माझ्या वडिलांच्या दूरदृष्टीचे प्रतीक होतं. त्याच वेळी, माझ्या आईने एक छोटं भाजीपाला दुकान सुरू केलं, म्हणजे ती भाजीपाल्याची ठोक खरेदी करायची आणि रोजच्या आयुष्याच्या गाठी मिळवण्यासाठी साधे नफा कमवायची. माझा भाऊ आणि मी ते भाजीपाला डोक्यावर घेऊन जात असू आणि आईला मदत करायचो. मी माझा अभ्यास उत्कृष्ट केला आणि जेव्हा मी १२ वीची परीक्षा पास केली, तेव्हा मला माझ्या शिक्षणाचा शेवट दिसत होता, कारण मी ठरवलं होतं की माझे पालक माझ्या शिक्षणासाठी पैसे पुरवू शकणार नाहीत. माझ्या इतर भावंडांच्या शिक्षणाचीही काळजी घ्यावी लागत होती."
"मी ती अमावस्येची रात्र आठवते, जेव्हा माझ्या आईने तिचा एकच दागिनं, तिचं मंगळसूत्र, माझ्या वडिलांना दिलं, ज्यामुळे त्यांना माझ्या एम.बी.बी.एस. प्रवेशासाठी कर्ज घेता आलं. आज मी ज्या ठिकाणी आहे, ते माझ्या पालकांच्या आणि भावंडांच्या बलिदानामुळेच आहे. मी त्यांना हे सगळं कधी परत देऊ शकेन का??? मला नाही वाटत!" डॉ. विजयलक्ष्मी देशमाने बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू येत होते.
"शाळेत मी कन्नड माध्यमातून शिक्षण घेतलं होतं आणि वैद्यकीय शिक्षण मात्र इंग्रजीत होतं. मला अगदी एप्रन शिवून घ्यायची लक्झुरी नव्हती. मी एक जुना एप्रन एका लॅब सहाय्यकाकडून उधार घेतला. आणि नंतर एकदा माझ्या एका सीनियरने त्याची स्टायपेंड मला दिलं, ज्यामुळे मी स्वतःसाठी एप्रन घेतला. माझ्या करिअरमध्ये, मला नेहमीच मार्गदर्शन, समर्थन आणि प्रेम मिळालं, हे माझ्या सहकारी आणि रुग्णांच्या प्रेमामुळेच आहे."
"मी माझ्या पहिल्या वर्षात अपयशी ठरले कारण जरी मला लेक्चर समजत होते, मला इंग्रजीत परीक्षा देताना खूप अडचणी येत होत्या. माझ्या प्राध्यापकांचे आभार, त्यांच्यामुळे मी दुसऱ्या वर्षात इंग्रजी शिकून घेतलं आणि त्यानंतर मी थांबले नाही. मी माझ्या विद्यापीठाची पहिली रँक मिळवली. हे वृत्त बाहेर आल्यानंतर, माझ्या घरात खूप आनंद साजरा केला गेला."
"मी शस्त्रक्रिया शास्त्रात एमएस सुरू केलं आणि मी Kidwai Institute of Oncology मध्ये शस्त्रक्रिया कर्करोग विभागात वरिष्ठ निवासी म्हणून काम सुरू केलं. मी स्तन कर्करोगाच्या उपचारात तज्ञ होते. दरम्यान, माझ्या भावाने, अजॉय घोष (प्रसिद्ध बंगाली स्वातंत्र्य सेनानींच्या नावावरून ठेवलेले त्याचे नाव), त्याचं एल.एल.बी. पूर्ण केलं आणि काम सुरू केलं. अखेर ती वेळ आली की आम्ही आमच्या घराच्या छप्पराचं पुनर्निर्माण करण्यासाठी पैसे मिळवू शकलो! त्या वेळेला घरचे छप्पर गळतीला लागले होते."
"माझं माझ्या व्यवसायाबद्दल प्रेम आहे आणि सातत्याने शिकण्यात मी विश्वास ठेवते. मी एक फोटोकोपी मशिन घेतली होती, जेणेकरून मला ज्ञानाची डेटाबेस सतत अद्यतन राखता येईल. मी नेहमीच रुग्णांसोबत संवाद साधला आणि त्यांच्याशी मजबूत नाते निर्माण केलं. जेव्हा मी शस्त्रक्रिया करते, तेव्हा मी सर्व भार देवावर ठेवते आणि त्याच्या हस्तक्षेपासाठी प्रार्थना करते. मला वाटतं की मी फक्त "निमित्त" आहे. मला माझ्या गुरूंनी घडवले, माझ्या सहकार्यांनी वाढवलं, रुग्णांनी प्रेम दिलं आणि हे सर्व त्याची (देवाची) इच्छा आहे की मी या व्यवसायात आहे, जो समाजाचे संरक्षण आणि सेवा करतो."
"माझ्या करिअरची लांबी जास्त आहे आणि मी २०१५ मध्ये निवृत्त झाले. पण मला वाटतं की माझं काम अर्धं राहिलं आहे. मी अनेक सामाजिक मोहिमांमध्ये, जाणीव जागृती शिबिरांमध्ये, संशोधन कार्यांमध्ये आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आहे. मी यापुढेही असेच महिन्यातील १५ दिवस या कार्यासाठी समर्पित करीन. उर्वरित १५ दिवस मी कर्नाटका कॅन्सर सोसायटीमध्ये मुक्त सेवा देत राहीन."
आमच्या प्राचीन शास्त्रांनी डॉक्टरांना देव म्हणून वर्णित केलं आहे, "वैद्यं नारायणो हरि". पहिल्यांदाच आम्हाला कळलं की हे विधान खरे आहे. झोपडपट्टीच्या मातीमध्ये फुललेल्या एका फुलाने आपल्या समाजाला खूप दिलं आहे आणि अजून खूप देण्यास तयार आहे. डॉ. विजयलक्ष्मी देशमाने यांच्या चार ही बहिणींच्या यशाची एक रोचक गोष्ट आहे. त्यांच्या चारही बहिणी पीएचडी पूर्ण करून त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करत आहेत.
डॉ. विजयलक्ष्मी देशमाने सध्या कर्नाटका कॅन्सर सोसायटीच्या उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत आणि आता त्या दर महिन्यातील १५ दिवस कर्नाटका कॅन्सर सोसायटीमध्ये मोफत सल्ला देण्यासाठी उपलब्ध असतात. त्यांना आणि त्यांच्या भावंडांना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा आणि आशा की त्यांचे जीवन आपल्यापैकी अनेकांना प्रेरणा देईल आणि मार्गदर्शन करेल.
भाषांतर:
प्रा. शिवा ऐथल
shiva.aithal@rediffmail.com
०५-०२-२०२५
कन्नड भाषा जरी समजत नसली तरीही त्यांचा हा इंटरव्ह्यू बघाच, त्यांची देहबोली, त्यांचे स्मित निरागस हास्य, त्यांच्या एका एका शब्दात त्यांना सपोर्ट केलेल्या लोकांबद्दल आणि समाजाबद्दलची कृतज्ञता, श्रीकृष्णावर असलेला त्यांचा विश्वास, सदा जमिनीवर असलेले पाय आणि मनात वाहणार प्रेम हे अतिशय प्रेरणादायी आहे.
https://youtu.be/WZBo3NzNpnw?feature=shared