09/06/2023
गोष्टी हा मुलांच्याच काय मोठ्यांच्याही आयुष्यातला मोलाचा ठेवा आहे.
गोष्टी ऐकत आणि बघत मुलं लहानाची मोठी होतात. त्याचवेळी या गोष्टी मुलांच्या मनांत त्यांचं स्वतःचं एक जग साकारत असतात. आपण कोण असावं, आपलं जग कसं असावं, आपलं आपल्या जगाशी नातं कसं-कसं असावं या सगळ्यांचा एक आराखडा मुलांच्या मनांत हळूहळू उमलत असतो. तीच असते आपली प्रत्येकाची सतत विकसित होणारी ‘माझी पहिली गोष्ट’!
मुलांच्या आयुष्यात गोष्टी अनेक वाटांनी प्रवेश करतात. आई-वडिलांनी, आज्जी-आजोबांनी आवर्जून ऐकवलेल्या काही गोष्टी असतात तशा भावंडांनी आणि सवंगड्यांनी निर्हेतुक, मुक्तपणे वाटलेल्या काही गोष्टी असतात. शिक्षकांनी मुद्दाम शिकवलेल्या काही गोष्टी असतात तशा मुलांनी आवर्जून शिकू नयेत अशाही अनेक गोष्टी समाज, समाज-माध्यमं, करमणूकीची साधनं अशा असंख्य मार्गांनी मुलांपर्यंत पोहोचतातच पोहोचतात. पण या सर्व प्रकारच्या गोष्टींनी साकारणारी मुलांच्या मनातली गोष्ट कुणी ऐकतो का? गोष्टी सांगण्यासाठी सरसावणारा समाज मुलांच्या मनात घडणाऱ्या-बिघडणाऱ्या गोष्टी ऐकायला उत्सुक आहे का? ‘माझी पहिली गोष्ट’ ही मुलांच्या अव्यक्त तहानेला दिलेला खुला प्रतिसाद आहे!
‘माझी पहिली गोष्ट’ हा मुलांच्या कल्पनाशक्ती, विचार, कुतूहल, प्रश्न, समस्या या कशालाच कोणतंही बंधन न घालता ‘व्यक्त होण्याला’ प्राधान्य देणारा प्रकल्प आहे. यात कच्च्या मातीला कुठलाही ‘खास आकार’ देण्याचा अट्टाहास आणि घाई नाही. त्यांच्या व्यक्त होण्याला शब्दांचं अपुरेपण बाधू नये म्हणून चित्रं आणि छायाचित्रांची जोड आहे. आणि मुलांच्या लिहित्या हातांना केवळ आधार देणारा कुशल शिक्षकांचा अदृष्य हात आहे!
आपापल्या मनांतली गोष्ट सांगण्याची, ऐकवण्याची संधी जितकी महत्वाची तितकीच ही गोष्ट समजून-उमजून घेण्याची सवय आणि सोय समाजाला लाभणं ही बाब देखील महत्वाची! गोष्टींतली पात्रं, प्रसंग, संवाद, कल्पना, दृष्यं इत्यादींमधून आपण स्वतःला आणि इतरांना खूप खोलवर समजून घेऊ शकतो. वरवर दिसणाऱ्या शब्दांमागचा आणि कागदावर न उमटलेल्या ओळींमागचासुद्धा भावनांचा अफाट पसारा वाचू शकणारा समाजच खरी माणूसकी वाचू शकतो आणि वाचवूही शकतो. ‘पहिल्या गोष्टी’चा हा प्रकल्प म्हणूनच फक्त मुलांना नव्हे तर मोठ्यांनाही माणूस म्हणून प्रगल्भ करू शकणारा प्रकल्प ठरावा!
— अनिमिष.