03/04/2024
काळा बिबट्या हा केवळ वन्यजीवप्रेमींसाठीच नव्हे तर सामान्य लोकांसाठीही चर्चेचा विषय असतो. "काळा बिबट्या" हा सामान्यतः सामान्य बिबट्याच आहे, ज्याला सामान्य लोक पँथर असेही म्हणतात. मेलानिझम ही एक अनुवांशिक स्थिती आहे ज्यामुळे गडद रंगद्रव्याचे प्रमान वाढते, परिणामी शरीरावर काळा किंवा गडद रंगाचा आवरण होतो. काळ्या बिबट्यांमध्ये त्यांच्या (नॉन-मेलेनिस्टिक) सामान्य बिबट्या सारखीच शारीरिक वैशिष्ट्ये आहेत, ज्यात
शरीरावरील खुणाचा ही समावेश आहे. तथापि, सावली मध्ये किंवा कमी प्रकाशाच्या त्यांच्या गडद रंगामुळे, या खुणा ओळखणे कठीण होऊ शकते, घनदाट जंगला मध्ये तसेच विशिष्ट पर्यावरणीय वातावरणात मेलानिझम असणाऱ्या किंवा काळ्या रंगाच्या प्राण्यांना एक अनुकूल फायदा होतो, जेथे गडद कोट काळ्या बिबट्यांना सावलीत मिसळण्यास आणि शिकार करताना लपून राहण्यास मदत करतो त्यामुळे ते घातक शिकारी बनतात. काळा बिबट्या भारत आणि आग्नेय आशियाच्या काही भागांसह आफ्रिका आणि आशियातील विविध प्रदेशांमध्ये आढळतात.
भारतीय बिबट्या चे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी आणि अवैध शिकार आणि व्यापार रोखण्यासाठी भारतातील विविध वन्यजीव कायद्यांतर्गत संरक्षित आहे. भारतातील वन्यजीव संरक्षण नियंत्रित करणारा प्राथमिक कायदा १९७२ चा वन्यजीव संरक्षण कायदा (WPA) आहे. या कायद्यांतर्गत, बिबट्यांना अनुसूची I प्रजाती म्हणून सूचीबद्ध केले आहे, जे त्यांना सर्वोच्च पातळीचे संरक्षण प्रदान करते. WPA व्यतिरिक्त, विविध राज्य सरकारांचे स्वतःचे नियम आणि वन्यजीव संरक्षणाशी संबंधित धोरणे आहेत, ज्यामध्ये बिबट्याच्या संरक्षणासाठी विशिष्ट उपायांचा समावेश आहे. यामध्ये अधिवास संवर्धन उपक्रम, मानव-वन्यजीव संघर्ष व्यवस्थापन धोरणे आणि शिकार, बेकायदेशीर वन्यजीव व्यापार, प्राण्यांवर अत्याचार, प्राण्यांवरील क्रूरता आणि संरक्षित प्रजातींना धोका कमी करण्याचे प्रयत्न यांचा समावेश आहे.
अलिकडच्या दशकात, भारताच्या विविध भागांमधून, मुख्यतः मध्य भारत, उत्तर पश्चिम घाट आणि दक्षिण पश्चिम घाटातून अनेक फोटोग्राफिक पुरावे मिळाले आहेत. महाराष्ट्रातील सातारा येथील औद्योगिक परिसरातून बिबट्याच्या तीन पिल्लांची सुटका केल्याची घटना सध्या घडली आहे. त्यापैकी एक काळ्या रंगाचे पिल्लू होते. त्यांची यशस्वीरित्या त्यांच्या आईशी भेट घालून देण्यात आली, पण कथा तिथेच संपत नाही. त्यां पिल्लांच्या सुटकेनंतर त्यांच्यासाठी खरा धोका आता सुरु झाला, कारण प्रसिद्धी साठी या घटनेचे सर्व फोटो आणी व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले, या सगळ्या प्रकारात संबंधित व्यक्तींनी या काळया बिबटयाच्या पिल्लाचे वास्तव्य उघडकीस आणले आहे, त्यामुळे काही वन्यजीव प्रेमी, प्रामुख्याने तथाकथित वन्यजीव छायाचित्रकार, आक्रमकपणे या शावकांचा पाठलाग करत आहेत. अनेक लोक साताऱ्याच्या काही भागात फिरत आहेत, विशेषत: काही ठिकाणी ( मी येथे स्थानांचा उल्लेख करत नाही), जिथे या व्यक्ती पायी आणि मोठमोठी टॉर्च, फ्लॅशलाइट आणि कॅमेरा सह कारमधून फिरत आहेत. ही बाब एवढीच नसून या मागे आजून एक मोठा धोका म्हणजे वाण्यजिवांची शिकार आणी तस्करी करणाऱ्यांचे ही या भागाकडे लक्ष केंद्रित झाले आहे. या सगळ्या प्रकाराला जबाबदार कोण करण त्या प्राण्याच्या आणि त्यांच्या अधिवासाच्या संरक्षणाचा प्रश्न उपस्तित झाला आहे, त्यासाठी आता संबंधित विभागाकडून कोणती "संवर्धन" धोरणे राबवली जातात हे पाहणे बाकी आहे…