30/06/2022
आयुर्वेदातील'सूतिकागार' अर्थात प्रसूती गृहनिर्माण.
नमस्कार,
प्रसूती या विषयावर लिहिण्यासारखे पुष्कळच आहे. अर्थात प्रसूती प्रक्रिया कशी होते, याची वैद्यकीय माहिती देणे इथे अपेक्षित नाही. पण मला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत, त्यापैकी पुढील काही महत्त्वाच्या आहेत व त्यांच्या विषयी क्रमशः माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
••• आयुर्वेदोक्त 'सूतिकागार' संकल्पना व त्याची थोडक्यात माहिती.
••• प्रसुतीच्या बाबतीत, जीची प्रसूती व्हायची आहे तिची भूमिका, तसेच, तिचे आप्तस्वकीय, नातेवाईक, आणि तिचे डॉक्टर, यांच्या भूमिका कशा असाव्यात या विषयी थोडेसे.
••• प्रसूती प्रक्रिया कशी असली पाहिजे या विषयाची, 'नवीन विचारांच्या', 'आधुनिक' प्रसूतीतज्ञांची मते. कारण, आधुनिक वैद्यकशास्त्राची विचारधारा ही, प्रसूतीप्रक्रियेचा, स्त्रीवर व बालकावर होणाऱ्या, 'शारीरिक-मानसिक' परिणामांचा विचार करते, तसेच प्रसूतीच्या, बाळाच्या व्यक्तिमत्त्वावर होणाऱ्या परिणामांना प्राधान्य देते. त्याविषयीची काही माहिती.
••• प्रत्यक्षात आधुनिक संशोधन व अभ्यासाद्वारे आढळून आलेले बाळाच्या व्यक्तिमत्वावर होणारे परिणाम.
••• या सगळ्याचा सारासार विचार करून,आपण काय करू शकतो, मुख्यतः आमच्या प्रसूतिगृहामध्ये आमचा काय करण्याचा हेतू व प्रयत्न असतो त्या विषयी थोडेसे.
सर्वप्रथम प्रसूती प्रक्रियेचा किंवा जन्म प्रक्रियेचा बाळावर काय परिणाम होतो, बाळाच्या व्यक्तिमत्त्वाची घडण व विकास यामध्ये त्यांची काय भूमिका आहे या विषयी आधी थोडा उल्लेख करावा असे वाटले. कारण की बाळाच्या व्यक्तिमत्त्वावर व स्वभाववैशिष्ट्यांवर आयुषभराकरता होणाऱ्या, भविष्यातील परिणामांची कल्पना आली, तर बाकीच्या गोष्टींचे महत्त्व अधिक लक्षात घेतले जाईल व त्यांचे प्राधान्य ठरवायला मदत होईल, असे वाटल्याने सुरुवात करायला हा विषय निवडला आहे.
आपली 'जन्मप्रक्रिया' हा आपणा सर्वांच्या आयुष्यातील एक अत्यंत सखोल, ठसठशीत व अत्यंत प्रभावी असा अनुभव असतो.
आपण लहानपणी ज्या प्रकारचे खेळ आवडीने खेळतो, त्या आपल्या आवडीनिवडी; तरुण व प्रौढ वयात ज्या गोष्टींमध्ये आपले मन रमते, किंवा, आपले मनोरंजन होते, त्या आपल्या आवडीनिवडी; (ज्या व्यक्ती व्यक्तीनुसार वेगळ्या असतात), इतकंच काय, पण लैंगिकतेमधील आपल्या असणाऱ्या आवडी, आपल्या 'अभिरुची', या सार्या गोष्टी कशाना कशा, काही प्रमाणात, आपल्या जन्माशी संबंधित असतात. विश्वास बसणे कठीण आहे,पण हे, या विषयातील आधुनिक संशोधने आणि अभ्यासांच्या मदतीने अधिकाधिक स्पष्टपणे सिद्ध होत आहे.
आपल्या अनेक आवडी-निवडी व स्वभाववैशिष्ट्ये ही आपला 'जन्म कसा झाला' यांच्याशी संबंधित किंवा त्यावर आधारित असतात असे निष्कर्ष निघाले आहेत.
फक्त प्रत्यक्ष प्रसूतीप्रक्रियेच्या बाबतीत सांगायचे तर, अत्यंत काटेकोरपणे केल्या गेलेल्या संशोधनांमधून एक गोष्ट अगदी खात्रीने सिद्ध झाली आहे की, प्रसूतीच्या वेळेच्या गर्भिणीच्या मनस्थितीचा, प्रसूतीच्या प्रक्रियेवर चांगला किंवा वाईट परिणाम निश्चितपणे होत असतो.
म्हणजे गर्भिणी जर सकारात्मक विचारांची असेल, आत्मविश्वास पूर्ण मनस्थितीने प्रसूतिला सामोरी गेली तर सुरक्षित, सुरळीत, निर्विघ्न होण्यास (Smooth, Without complications) मदत मिळते, हे अगदी १०० % खरे आहे. हे अभ्यास व प्रयोगांनी सिद्ध झाले आहेच. पण आमचा स्वत:चा देखील तसा अनुभव आहे. इतरही जवळजवळ सगळे प्रसूतीतज्ञ हे अगदी निश्चितपणे मान्य करतील.
याउलट, नकारात्मकता, आत्मविश्वासाचा अभाव, चिंता, यांनी जर गर्भिणी त्रस्त असेल, तर प्रसूती प्रक्रियेमध्ये अडचणी येणे, विलंब लागणे, कष्टदायक व क्लिष्ट प्रसूती होणे या गोष्टी कमी-अधिक प्रमाणात निश्चितपणे आढळतात.
वर दिलेल्या मुद्द्यांपैकी, आयुर्वेदात आलेले सूतिकागाराचे वर्णन थोडक्यात आधी देतो. म्हणजे वर उल्लेखलेल्या व त्यासारख्या इतर अनेक मुद्द्यांचा विचार आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वी केला गेला असल्याचे निदर्शनास आल्यावाचून राहणार नाही.
श्लोकबध्द स्वरुपातले व थोडे संदिग्ध वाटणारे असे वर्णन, हा आयुर्वेद साहित्यसंपदेचा कमकुवतपणा (Draw back) आहे की काय असे कधीकधी वाटल्यावाचून रहात नाही. असो.
तर वर सांगितल्याप्रमाणे क्रमशः मुद्दे विचारात घेत असताना, सर्वप्रथम आयुर्वेदीय सुतिकागारा विषयी सांगतो.
आयुर्वेदीय ग्रंथांमधील श्लोकरुपाने आलेल्या वर्णनाचे हे भाषेच्या मर्यादेमुळे, थोडे स्वैर म्हणता येईल असे हे मराठी रूपांतर आहे.
"९ वा महिना पूर्ण होण्यापूर्वी अस्थि, दगड-गोटे,इ. सारख्या गोष्टीचा पूर्ण अभाव असणाऱ्या, सुंदर, दर्शनीय, सुगंधित अशा भूमीमध्ये बिल्व, तिदुंक, इगुंदी,भल्लातक, वरूण किंवा खदिर (ही वृक्षांची नावे आहेत.) यांच्या लाकडांपासून 'सुतिकागाराची' निर्मिती करावी."
[ या ठराविक वृक्षांची नावे सांगणे यामागील शास्त्रीय कारण आज नीतीला सांगणे अवघड आहे. पण आधुनिक शास्त्र व पाश्चिमात्य शास्त्रज्ञ (आपण भारतीय नव्हे.) कधीनाकधी त्याचाही शोध लावल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्याचे शास्त्रीय कारण सापडल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे.]
"सुतिकागार हे, 'वस्त्र', 'आलेपन', 'आच्छादन' आणि 'अपिधान' यांनी युक्त असावे." ( याचा अर्थ- आज कालच्या वास्तुशास्त्र भाषेत पडदे, Plastering, ceilings, इत्यादिंनी युक्त असावे असा होतो.)
"वास्तुशास्त्रतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, कपाटे, अग्नि (Fire place), जल (पाण्याची सोय), वर्चस्थान (शौचालय), स्नानगृह (Bathroom), स्वयंपाकघर इ. नी युक्त असे, सर्व ऋतूंमध्ये अनुकूल राहील असे सुतिकागार बनवून घ्यावे."
"आठ हात लांब व चार हात रुंद (अंदाजे ८ × ४ मीटर) एवढ्या आकाराचे प्रसूतिगृह असावे."
या सार्या वर्णनामधील शास्त्रीयता, काटेकोरपणा आणि दूरदृष्टी अचंबित करणारी आहे.
अत्याधुनिक प्रसूतिगृहांशी तंतोतंत जुळणारे आणि आयुर्वेद शास्त्रांच्या पारंपरिक ज्ञानाची भर असणारे आणखी काही वर्णन आणि आपला पुढचा मुद्दा पुढील लेखात पाहू.
(क्रमशः..)
ही लेखमाला आपल्याला आवडत असेल तर कृपया Like करा, आपल्या मित्र-मैत्रीणींना, व ज्यांना याचा उपयोग किंवा गरज असेल, किंवा यात रस / कुतूहल असेल अशांना जरूर share करा, आवर्जून प्रतिक्रिया द्या आणि पेजवर 'Reviews' मध्ये comment नक्की करा.
धन्यवाद
डॉ विनायक लेले
MD (ayu)
https://www.facebook.com/drleleprenatal/