
09/06/2022
आयुर्वेद यात्रा
लेख १४४
कालच शिरूरमध्ये जोरदार पाऊस झाला आणि आज शेतात फिरताना मला पुनर्नवा ही औषधी वनस्पती दिसली. पुनर्नवा म्हणजे पुन्हा पुन्हा नवीन उगवणारी वनस्पती! संस्कृत नावे किती सार्थ असतात नाही का? ही वनस्पती ग्रीष्मात सुकते आणि पावसाळ्यात पुन्हा उगवते म्हणून हिचे नाव पुनर्नवा !
पावसाळ्यात अनेक औषधी वनस्पती जागोजागी आपोआप उगवतात. जसे *पुनर्नवा' गोरखमुंडी, नागरमोथा, आघाडा, गोकर्ण, दुर्वा, कुर्डू, मुसळी, भुईआवळा, अश्वगंधा, धोत्रा, सराटे, टाकळा*. . . अशा कितीतरी वनस्पती निसर्गकृपेने आपल्या आजूबाजूला उगवतात. या सर्वांचा औषधी उपयोग होतो.
सहज उपलब्ध असणाऱ्या या वनस्पतींची ओळख दिवसेंदिवस आपण विसरत आहोत
आपल्या आजीपर्यंत परिसरातील वनस्पतींचे सहज ज्ञान घराघरामध्ये अवगत होते आणि एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे अलगद पोहोचत होते. सध्या धावपळीची जीवनशैली वेळेचा अभाव आणि केमिकल औषधांची सहज उपलब्धता यामुळे निसर्गाविषयीचं कुतूहलही संपत आहे. आपली मुले निसर्गाचे ज्ञान मिळवतात तेही टीव्हीसमोर बसून!! डिस्कव्हरी किंवा अन्य चॅनल्सकडून!
प्रत्यक्ष निसर्गात जाऊन अशा वनस्पती पाहणे,त्यांना स्पर्श करणे', त्यांचा शोध घेणे अशा छोट्या पण आवश्यक आनंदालाही आपण पारखे होत आहोत. कधीतरी घरातील सर्वांनीच मिळून आजूबाजूच्या शेतावर, रस्त्याच्या कडेला' कुठल्या वनस्पती कुठल्या काळात उगवतात? त्यांचा रंग, पोत, स्पर्श, गंध यांचा अनुभव घेऊन त्यांच्या उपयोगांची माहिती घेऊया. *सहल म्हणजे नेहमी दूरदूरच्या पर्यटनस्थळांना भेटी देणे एवढेच नसून अशा छोट्या परिसर भेटी आपल्याला नक्कीच समृद्ध करतील.*
*प्लास्टिकचे फूल कितीही सुंदर असले तरी खऱ्या फुलाचा सुगंध आणि सौंदर्य हा अनुभवायचाच विषय आहे. तसेच पुस्तकी ज्ञान कितीही असो, गुगलवर माहितीचा खजिना कितीही असो, तरी निसर्गातल्या या वनस्पती हा अनुभवाचाच विषय आहे.*
चला, या पावसाळ्यात सर्वांनी एखाद्या माहितगार व्यक्तीला बरोबर घेऊन अशा वनस्पतींची माहिती मिळवूया. *आयुर्वेदाने हे परिसर ज्ञान मुक्तहस्ते आपल्यापर्यंत पोहचवले आहे. त्याचे जतन-संवर्धन-संगोपन करणे ही आपली जबाबदारी आहे*
शुभम भवतु
डॉक्टर स्मिता चोरडिया बोरा आयुर्वेद वाचस्पती शिरूर
https://chat.whatsapp.com/G8VvEUefjAUAx4ZF7Ao90x
WhatsApp Group Invite