
11/03/2025
ग्लॉकोमा (काचबिंदू)– दृष्टी शांतपणे घालविणारा शत्रू!
आज वर्ल्ड ग्लॉकोमा वीक (World Glaucoma Week) निमित्त, या धोकादायक डोळ्याच्या आजाराविषयी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागात ग्लॉकोमा (काचबिंदू) वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे डोळ्यांची नियमित तपासणी न होणे. बहुतांश लोक चष्म्याच्या दुकानात चष्मा तपासून घेतला की डोळ्यांची संपूर्ण तपासणी झाली असे गृहीत धरतात. वास्तविक, काचबिंदू ओळखण्यासाठी विशेष चाचण्यांची गरज असते. पण या आजाराला कोणतीही स्पष्ट लक्षणे नसल्यामुळे, जेव्हा डॉक्टर या चाचण्यांची शिफारस करतात, तेव्हा अनेकजण त्या उगाच सांगितल्या आहेत असे समजतात आणि योग्य वेळी तपासणी करून घेत नाहीत. परिणामी, आजार बळावतो आणि दृष्टी गमावण्याची शक्यता वाढते.
ग्लॉकोमा म्हणजे काय?
डोळ्यातील वाढलेला दाब ऑप्टिक नर्व्ह (optic nerve – डोळ्यातील प्रकाश मेंदूकडे पोहोचवणारी वाहिनी) ला हळूहळू इजा करतो आणि त्यामुळे दृष्टी कमी होत जाते. योग्य वेळी उपचार न केल्यास कायमचे अंधत्व येऊ शकते. म्हणूनच ग्लॉकोमाला “सायलंट थीफ ऑफ व्हिजन” (दृष्टीचा शांत चोर) असे म्हणतात.
कोणत्या व्यक्तींना ग्लॉकोमा होण्याचा अधिक धोका असतो?
✔️ ४० वर्षांवरील व्यक्ती
✔️ कुटुंबात आधी कोणाला ग्लॉकोमा झालेला असेल
✔️ मधुमेह, उच्च रक्तदाब, मायग्रेन किंवा थायरॉईड समस्या असणारे
✔️ डोळ्याला पूर्वी इजा झालेली असेल
✔️ दीर्घकाळ स्टेरॉईड औषध घेणारे
ग्लॉकोमाची लक्षणे:
ग्लॉकोमा सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे देत नाही, मात्र पुढील लक्षणे आढळू शकतात –
🔹 बाजूची (peripheral ) दृष्टी मंदावणे
🔹 प्रकाशाच्या भोवती वलय दिसणे
🔹 डोळ्यांत जडपणा किंवा डोकेदुखी
🔹 अचानक दृष्टी धूसर होणे
काचबिंदू कसा ओळखावा?
फक्त नियमित डोळ्यांची तपासणी करूनच ग्लॉकोमा लवकर ओळखता येतो. यासाठी पुढील चाचण्या केल्या जातात –
✔️ डोळ्याचा दाब मोजणे (Tonometry)
✔️ ऑप्टिक नर्व्ह तपासणी (Ophthalmoscopy)
✔️ दृष्टिक्षेत्र चाचणी (Perimetry)
ग्लॉकोमाचा उपचार आणि व्यवस्थापन
ग्लॉकोमा पूर्णपणे बरा होत नाही, मात्र योग्य उपचारांद्वारे हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. उपचारांमध्ये –
✅ डोळ्यांतील दाब कमी करणाऱ्या औषधांच्या ड्रोप्स
✅ लेझर उपचार
✅ आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया
परंतु, लक्षात ठेवा – ग्लॉकोमामुळे गेलेली दृष्टी पुन्हा येत नाही, त्यामुळे वेळीच निदान आणि उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ग्लॉकोमा टाळण्यासाठी काय करावे?
✔️ ४० वर्षांनंतर नियमित डोळ्यांची तपासणी करावी
✔️ मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवावा
✔️ डोळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी
✔️ कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये
ग्लॉकोमा टाळता येत नाही, पण वेळीच निदान आणि योग्य उपचार केल्यास दृष्टी वाचवता येऊ शकते. त्यामुळे आजच आपल्या नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन डोळ्यांची संपूर्ण तपासणी करून घ्या!