15/12/2019
*जीवनसत्त्वे (Vitamins)*
सर्व सजीवांच्या वाढीसाठी कर्बोदके, मेद, प्रथिने आवश्यक असतात. या कार्बनी पदार्थांव्यतिरिक्त काही विशिष्ट कार्बनी संयुगांची अल्प प्रमाणात आवश्यकता असते. या संयुगांची त्रुटी निर्माण झाल्यास सजीवांची वाढ खुंटते. तसेच त्यांना काही विकार उद्भवतात. अशा कार्बनी संयुगांना जीवनसत्त्वे म्हणतात.
*प्रकार*
जीवनसत्त्वांचे स्निग्ध पदार्थात विरघळणारी मेदविद्राव्य व पाण्यात विरघळणारी जलविद्राव्य असे गट केले जाते. अ, ड, ई, के ही मेदविद्राव्य आणि ब, क ही जलविद्राव्य जीवनसत्त्वे आहेत.
मेदविद्राव्य जीवनसत्त्वाच्या गटात अ, ड, ई आणि के या जीवनसत्त्वांचा समावेश होतो.
*जीवनसत्त्व अ :*
दूध व दुधापासून मिळविलेली साय, लोणी व तूप तसेच पालक, कोथिंबीर, मका, सुरण, रताळी, टोमॅटो, गाजर, लाल भोपळा, पपई व आंबा यांत ते भरपूर प्रमाणात असते.
अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्पष्ट दिसत नाही व रातांधळेपणा येतो.
*जीवनसत्त्व ड :*
जीवनसत्त्वात ‘ड२’ आणि ‘ड३’ असे प्रकार आहेत. ‘ड२’ जीवनसत्त्वाची रासायनिक नावे अरगोकॅल्सिफेरॉल, कॅल्सिफेरॉल, व्हायोस्टेरॉल अशी आहेत.
सर्व प्राण्यांत ते अल्प प्रमाणात असून जठर आणि यकृतात असते.
त्याचे कार्य आणि परावटू ग्रंथीतील पॅराथॉर्मोन संप्रेरकाचे कार्य एकमेकांस पूरक असते. कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजांच्या चयापचयावर ड जीवनसत्त्वाचे नियंत्रण असते. शरीरातील हाडे आणि दात यांच्या जडणघडणीवर डजीवनसत्त्वाचा परिणाम होतो.
ड जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे लहान मुलांच्या बरगडया, मनगट, पाय यांच्या हाडांमध्ये बदल होतात. शरीरातील लांब हाडांच्या टोकाशी कूर्चा तयार होते, हाडे वाकल्यामुळे बरगडया व पायांना बाक येतो, कवटीच्या हाडांचे कॅल्सीभवन होत नाही आणि दात किडतात. या लक्षणांना मुडदूस विकार म्हणतात.
ड जीवनसत्त्वाच्या अभावे प्रौढांना अस्थिमार्दव विकार होतो. त्यामुळे हाडांतील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन हाडे ठिसूळ होतात. ड जीवनसत्त्वाच्या अतिसेवनाने विषाक्तता होते. रक्तातील कॅल्शियम व फॉस्फरसची पातळी वाढते, वृक्क व रक्तवाहिन्यांत कॅल्सीभवन होते आणि डोकेदुखी, थकवा व पोटदुखी उद्भवते.
*जीवनसत्त्व ई :*
याचे रासायनिक नाव टोकोफेरॉल आहे.
करडई, शेंगदाणा, मका व सरकी यांच्या तेलात, कडधान्ये, डाळी, हिरव्या पालेभाज्यांमध्ये ई जीवनसत्त्व असते.
जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे स्नायूंची वाढ खुंटते. उंदरांवरील प्रयोगात मादीतील वंध्यत्व व नरात वृषण अपकर्ष यावर ईजीवनसत्त्व उपयुक्त ठरते असे आढळून आले आहे. ते प्रजननासाठी आवश्यक असून वंध्यत्व, गर्भपात इ. विकृतींकरिता वापरतात. या जीवनसत्त्वाच्या अतिसेवनाने विषाक्तता होत नाही.
ई जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे लिपिड पेरॉक्साइडे रक्तपेशीत साठविली जातात आणि पेशीपटलात विकृती निर्माण होऊन त्या पेशी लवकर नाश पावतात. केशवाहिन्यांमधील रक्ताच्या पारगम्यतेवर विपरित परिणाम होऊन द्रवयुक्त सूज येते आणि पांडुरोग होतो.
*जीवनसत्त्व के :*
के जीवनसत्त्व हिरव्या पालेभाज्यांत, विशेषत: पालक या भाजीत भरपूर प्रमाणात असते. कोबी, फुलकोबी, टोमॅटो, सोयाबीन, अंड्याचा पिवळा बलक व माशांचे चूर्ण यांतही ते असते. लहान आतड्यातील जीवाणू अन्नपदार्थातील पूर्वगामी घटकांपासून हे जीवनसत्त्व तयार करतात.
या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठायला वेळ लागतो. अतिरक्तस्राव टाळण्याचे कार्य के जीवनसत्त्व करते. अतिरक्तस्रावाची शक्यता असल्यास गर्भवती मातांना प्रसूती आधी आणि नुकत्याच जन्मलेल्या बालकांना के जीवनसत्त्व देतात.
*ब – समूह जीवनसत्त्वे :*
*जीवनसत्त्व ब१:*
हातसडीचे तांदूळ, कोंड्यासह असलेला गहू, बाजरी, ज्वारी, गव्हांकुर, भाज्या, अंडी, मांस आणि सागरी मासे यांत मोठया प्रमाणावर थायामिन असते.
त्यांच्या त्रुटीमुळे भूक कमी होणे, वजन घटणे, पावले वाकडी होणे, हृदयाची गती कमी होणे, मेंदूवर परिणाम होणे व तोल जाणे ही लक्षणे दिसून येतात. या लक्षणांना पॉलिन्यूरायटिस अथवा बेरीबेरी म्हणतात.
*जीवनसत्त्व ब२ :*
तृणधान्ये, डाळी, मांस, दूध इत्यादींमध्ये हे जीवनसत्त्व मुबलक असते.
त्याच्या त्रुटीमुळे तोंडाच्या कडांना चिरा पडणे, जीभ लाल होऊन दाह होणे, नाक, डोळे व कान यांच्या कडांभोवतीच्या त्वचेवर सूज येणे अशी लक्षणे दिसतात.
*जीवनसत्त्व ब३ :*
ब३ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे वल्कचर्म (पेलाग्रा) हा त्वचेचा विकार उदभवतो. या विकारात त्वचा सुजून लाल आणि नंतर काळी होऊन खरखरीत होते, जीभ काळी पडून खरखरीत होते. बालकांची वाढ खुंटते.
*फॉलिक आम्ल :*
तृणधान्ये,हिरव्या भाज्या,केळी व पालक यांत फॉलिक आम्ल अधिक असते.
याच्या त्रुटीमुळे अतिसार,हिरडया सुजणे,अस्थिमज्जेची अभिवृद्धी,रक्तक्षय व पांडुरोग अशी लक्षणे दिसतात.गर्भावस्थेत कमतरता असल्यास मातेला पांडुरोग होतो व गर्भदोष निर्माण होऊ शकतो.
*जीवनसत्त्व ब१२ :*
ब१२जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे मारक पांडुरोग होतो. त्यामुळे पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी होते, अंत:स्रावी ग्रंथीच्या कार्यात बिघाड होतो आणि मेरुरज्जूचा ऱ्हास होतो. गर्भावस्थेत मातेला योग्य प्रमाणात फॉलिक आम्लाचे अंत:क्षेपण केले जाते.
*जीवनसत्त्व क :*
याचे रासायनिक नाव ॲस्कॉर्बिक आम्ल आहे. लिंबे, संत्री, द्राक्षे. स्ट्रॉबेरी, केळी, अननस, सफरचंद, कलिंगड, आवळे, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, टोमॅटो, ओला वाटाणा, शेवग्याच्या शेंगा, कोबी, बीट व गाजर यांत क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.
क जीवनसत्त्व त्रुटीमुळे होणाऱ्या विकारास स्कव्र्ही म्हणतात. या विकारात मनुष्याचे वजन घटते, थकवा येतो, सांधे सुजून दुखू लागतात, हाडे ठिसूळ होतात व स्नायू कमजोर होतात, हिरड्या सुजतात, रक्तस्राव होतो आणि सौम्य स्पर्शानेही हिरड्यांमधून रक्त येते. परिणामी दात सैल होतात. या जीवनसत्त्वाची कमतरता झाल्यास प्रतिकारशक्ती कमी होते.