09/12/2025
आयुर्वेदातील दुर्मिळ “अनुभवामृत” ग्रंथाचे इंग्रजी अनुवादन – वैद्या गायत्री देशपांडे यांचा गौरव
आयुर्वेदातील चिकित्सेला प्राधान्य देणारा आणि अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा वैद्यराज नृसिंह नारायण बागेवाडीकर लिखित “अनुभवामृत” हा ग्रंथ शेठ सखाराम नेमचंद औषधालय ट्रस्ट, सोलापूर यांनी प्रकाशित केला होता. या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर करण्याचा मान शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय, सोलापूर येथील संस्कृत संहिता–सिद्धांत विभागातील सहाय्यक प्राध्यापिका वैद्या सौ. गायत्री समीर देशपांडे यांना प्राप्त झाला असून, हे अनुवादन केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद (CCRAS), आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने साकारले आहे.
“अनुभवामृत” या इंग्रजी अनुवाद ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच बेंगलोर येथे CCRAS च्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात पार पडला. देशभरातून उपस्थित 1000 हून अधिक आयुर्वेद क्षेत्रातील विद्वानांच्या समोर वैद्या गायत्री देशपांडे यांच्या प्रभावी भाषणाने कार्यक्रमास विशेष बहार प्राप्त झाली. यावेळी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मूळ ग्रंथकार वैद्य नृसिंह नारायण बागेवाडीकर तसेच इंग्रजी अनुवादकर्त्या वैद्या गायत्री देशपांडे यांनी हा ग्रंथ शेठ सखाराम नेमचंद दोशी यांना संयुक्तरित्या अर्पण केला आहे.
या कार्याबद्दल शेठ सखाराम नेमचंद जैन औषधालय ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री. अरविंदजी दोशी, सचिव डॉ. प्रदीप कोठाडिया, सहसचिव डॉ. आदर्श मेहता, विश्वस्त सौ. प्रियदर्शनी जडेरीया, श्री. प्रीतम दोशी, प्राचार्या वैद्या वीणा जावळे, उपप्राचार्य वैद्य शांतीनाथ बागेवाडी, प्रशासकीय अधिकारी श्री. अनुप दोशी यांनी वैद्या गायत्री देशपांडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
वैद्या गायत्री देशपांडे यांच्या या उल्लेखनीय योगदानाचे सर्वत्र कौतुक होत असून, आयुर्वेद साहित्यसमृद्धीमध्ये त्यांनी दिलेल्या या मोलाच्या योगदानाची देशभरात प्रशंसा होत आहे.