18/07/2025
*हठयोगी निकम गुरुजी*
*‘ज्याचा देह झिजे अखंडितपणे*
*कार्यार्थ लोकांचिया |*
*माता, बंधू पित्यासमान सकला*
*चित्तात मानुनिया |*
*त्यक्त ब्रीद न पतला जरी पुढे देहावसानावधी |*
*ऐसा थोर नर जो तो कर्मयोगी सुधी |’*
प.पू. गुरुजींचे गुणवर्णन शब्दांकित करणे म्हणजे जन्मांध व्यक्तींच्या हत्तीच्या वर्णनाप्रमाणे होईल, गुरुजी म्हणजे विलक्षण चुंबकीय व्यक्तिमत्व ! मूर्ती छोटी,साधी, सात्विकभावयुक्त व प्रसन्न. त्यांना एकदा भेटल्यावर विसरणे मुश्कीलच ! मनुष्य कर्मांनी महान बनतो. जन्म घेणे हातात नसले तरी, कर्म करणे हातात असते. *‘नर करणी करे सो नर का नारायण होता है’* हे त्यांचे वाक्य त्यानांच लागू पडते. गुरुजींची दैवते म्हणजे त्यांचे आईवडील. नाव सुद्धा त्यांना सार्थ लाभलेले- पुंडलिक- अगदी भक्त पुंडलिकाप्रमाणे ते म्हणत आईवडिलांच्या आशीर्वादाचे फलित, मी या मार्गावर आलो.’ ह्याला म्हणतात,*‘ईश्वरप्रणिधान’*
नवनाथपंथीयांची उठबस, साने गुरुजी, विनायक महाराज मसुरकर यांचे सान्निध्य, गुरुजी सुर्योपासक बनले. ‘शक्ती व भक्ती यांची साधना हातात हात घालून चालू राहिली पाहिजे. हे गुरुजींचे तत्व, त्यामुळेच आसने, षट्कर्म, प्राणायाम, बंधमुद्रा यात रमणारे गुरुजी ॐकार, गायत्रीमंत्रामध्येही तन्मय होऊन शेवटी आई-आई हे कवन भक्तिरसात डुंबून म्हणायचे, की ऐकणाऱ्याच्या डोळ्यातून पाणी वाहात असे. शक्ती माणसाला राक्षस बनविते, तर भक्ती दुबळे बनविते, हे गुरुजी आवर्जून सांगत. म्हणून शक्ती व भक्तीची सांगड आपल्या कुटीराच्या अभ्यास क्रमामध्ये प.पू. गुरुजींनी बेमालूमपणे घातलेली आहे.
श्री समर्थांचे म्हणणे गुरुजी अधिक स्पष्ट करून सांगत, ‘स्वतःवर विश्वास ठेवा व आतून मिळणारा आवाज ऐका व त्यानुसार कर्म करा.’ *’आत्मा वै गुरुरेव च |’* हा गुरुजींचा कर्मयोग.
ते जनता-जनार्दन या नात्याने ते साधकांकडे बघत. स्त्रियांच्या आरोग्याबाबत गुरुजी अतिशय जागरुक असत. स्त्रियांना बेटी,ताई, माई म्हणून संबोधून तिच्या मानसिक असंतुलनाचे कारण गुरुजी लीलया काढून घेत. आयुर्वेद, योग, शिवांबूचिकीत्सा, मालिश, निसर्गोपचार यांचा प.पू. गुरुजींच्या अभ्यासाचा व्यासंग दांडगा होता. व त्याहीपेक्षा ह्या सगळ्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करण्याचे उदार अंत:करण त्यांच्याकडे होते. *’बुडते हे जन पहावे न डोळा ‘* ह्या संतांच्या उक्तीप्रमाणे ते वागले.
अध्यात्म, हठयोग, कुंडलिनी, शक्तीपात-दीक्षा याबाबत प.पू. गुरुजींचा अभ्यास सखोल व वास्तववादी होता. अध्यात्माचा रस्ता हा संपूर्ण स्वास्थ्यातून जातो व तोच श्रेयस मार्ग आहे, असे ते म्हणत.
गुरुजी १८ जुलै १९९९ रोजी पंचतत्वात विलीन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत साधना-सेवा-सत्संग ही त्रिसूत्री त्यांनी आपल्या जीवनात अविरत अंगिकारली. गुरुजी सर्वव्यापी झाल्यानंतर मन थोडे सैरभैर झाले. परंतु त्यांनीच दिलेल्या सुसंस्कारांनी मन सावरले व कार्य पुन्हा जोमाने सुरु झाले व ते सुरूच आहे.
*सारी धरती कागत करुँ, लेखनी सब बनराय*
*सात समुद्रकी मस्सी करुँ, गुरुगुण लिखा न जाय,....*