24/03/2023
*जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने*: *YES WE CAN END TB*
दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणुन जगभर साजरा करण्यात येतो. याच दिवशी 1882 साली रॉबर्ट कोच या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांनी Mycobacterium Tuberculosis या जिवाणू चा शोध लावला होता. जागतिक आरोग्य संघटने (WHO) द्वारे क्षयरोगाच्या शारीरिक, आर्थिक, सामाजिक हानिकारक परिणामां बद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
त्यानिमित्त क्षयरोगा विषयी काही महत्त्वपूर्ण माहिती:
*1. क्षयरोग काय आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत?*
हा एक जिवाणूजन्य आणि संसर्गजन्य आजार आहे. त्याला TB किंवा Tuberculosis म्हणुन सुद्धा संबोधले जाते. Mycobacterium Tuberculosis नवाच्या जिवाणू मुळे हा आजार होतो. हा आजार गंभीर सुद्धा असू शकतो मात्र त्याच वेळी तंत्रशुद्ध औषधिद्वारे पूर्ण पणे बरा होऊ शकतो.
*लक्षणे*:
- 2 आठवड्यां पेक्षा जास्त काळ खोकला
- सतत चा किंवा अधून मधून ताप असणे/ संध्याकाळचा ताप
- भूक मंदावने
- वजन कमी होने
- थुंकीत रक्त पडणे
*2. क्षयरोग कसा पसरतो?*
क्षयरोगाने ग्रस्त व्यक्तीच्या खोकन्यातून, थुंकण्यातून, बोलण्यातून ह्या आजाराचा प्रसार होण्यास मदत होते. ज्या वेळेस TB चा रुग्ण थुंकतो, खोकल्याने किंवा जोरात बोलतो त्या वेळी सूक्ष्म कण किंवा droplet मार्फत TB चे जिवाणू बाहेर पडतात व संपर्कात येणार्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतात. अशा व्यक्तींना पुढे चालून (रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यास) TB ची बाधा होऊ शकते. हा आजार आपल्या शरीरातील कोणत्याही अवयवाला (मेंदु, डोळे, त्वचा, मणके, फुप्फुस, पोट, लसीका ग्रंथी, गर्भसंस्था, जनेंद्रिये, इत्यादि) बाधित करू शकतो मात्र याचा सर्वात जास्त संसर्ग हा आपल्या फुप्फुसा ना होतो. फुप्फुसा चा क्षयरोग हा बाकी अवयवांच्या तुलनेत अतिशय संसर्गजन्य असतो.
*3. कोणत्या गोष्टी TB चा प्रसार होण्यास पूरक ठरू शकतात?*
दाट लोकवस्ती, कोंदट घरे, अस्वच्छ वातावरण, कुपोषण, कमकुवत झालेली रोग प्रतिकारशक्ती (मधुमेह, HIV/AIDS, किडनी आणि लिवर चे आजार, steroid ची ट्रीटमेंट सुरू असलेले रुग्ण ) ह्या गोष्टी TB ची लागण होण्यास पूरक ठरू शकतात.
*4. TB ची लक्षणे आढळल्यास काय करावे?*
वरील सांगितल्या प्रमाणे लक्षणे आढळल्यास ह्या आजाराचे निदान करून घेणे आवश्यक ठरते. निदान करून घेण्यासाठी जवळच्या आरोग्य केंद्र, सरकारी रुग्णालय, खासगी रुग्णालय येथे जाऊन डॉक्टरांना दाखवावे. *थुंकी तपासणी* , छाती चा Xray किंवा CT scan करून क्षयरोगाचे निदान केले जाते.
*5. TB चे निदान झाल्यास पुढे ट्रीटमेन्ट काय?*
TB चे निदान झाल्या नंतर त्वरित औषध उपचार सुरू होणे महत्त्वाचे आहे. औषधा ना दाद देणारा TB (Drug sensitive TB) असल्यास साधारणपणे 4 प्रकारची औषधि दिली जातात. (Isoniazid, Rifampicin, Ethambutol, Pyrazinamide). ही सर्व औषधि गोळ्यांचा स्वरुपात उपलब्ध असतात. ह्या औषधानचा डोस हा आपल्या वजना प्रमाणे ठरवला जातो. ट्रीटमेंट चा कालावधी हा कमीत कमी 6 महीने किंवा अधिक असू शकतो. ही सर्व औषधि राष्ट्रीय क्षयरोग उन्मूलन कार्यक्रमा अंतर्गत मोफत मिळतात किंवा खासगी मार्फत सुद्धा घेता येतात.
*6. TB चे उपचार नियमित पणे न घेतल्यास किंवा ट्रीटमेंट घेण्यात हलगर्जीपणा झाल्यास काय होईल?*
अशा वेळी TB चे अतिक्रमण सर्व शरीरात होऊ शकते. रुग्ण गंभीर होण्याचा धोका उद्भवू शकतो व TB जीवघेणा पण ठरू शकतो. सोबतच उपचारांना दाद न देणारा म्हणजेच multi drug resistant tb (MDR TB) होण्याचा धोका होऊ शकतो.
*7. MDR आणि XDR TB म्हणजे काय?*
MDR (Multi drug resistance) TB म्हणजे TB च्या ट्रिटमेंट मध्ये वापरण्यात येणार्या महत्वाचे औषध (Isoniazid आणि Rifampicin) यांना प्रतिसाद न देणारा TB आहे. XDR TB (Extensively drug resistant tuberculosis) म्हणजे TB च्या ट्रीटमेंट मध्ये वापरन्यात येणार्या स्टँडर्ड औषधा ना ( MDR + Levoflox + Bdq/linezolid) प्रतिसाद न देणारा TB आहे.
MDR व XDR TB वर उपचार हे दीर्घ काळ चालतात (1 ते 2 वर्षे). आणि दीर्घकाळ उपचारा नंतर सुद्धा रुग्ण पूर्ण पणे बरा होईल ही शाश्वती नाही. सोबतच औषधानचे होणारे दुष्परिणाम हे काळजीचा विषय ठरू शकतात.
*8. क्षयरोग आपल्या समाजातून/ देशातून हद्दपार करण्यासाठी आपले दायित्व काय?*
-सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, खोकणे टाळावे. खोकलताना किंवा शिंकताना रुमाल लावावा.
-आपल्याला TB ची लक्षणे आढळल्यास आजार अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांना भेटून आजाराचे निदान करावे व उपचार सुरू करावेत.
-TB ची औषधी ही सांगितल्या प्रमाणे नियमीत घेणे अतिशय आवश्यक आहे. ट्रीटमेन्ट मधील अनियमितता धोकादायक ठरु शकते.
-क्षयरोगाच्या रुग्णाचे पोषण हे चांगले असणे महत्वाचे आहे. पोषण हे प्रथिने युक्त असावे.
-ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनी सावधानी बाळगणे महत्त्वाचे आहे. मधुमेहाचा रुग्णांनी आपली शुगर नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. HIV च्या रुग्णांनी नियमित पणे ART ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे.
*सार्वजनिक ठिकाणी घ्यायची काळजी, लवकर निदान, संपूर्ण औषध उपचार, सकस आहार, परस्पर विश्वास व प्रेम, रूग्णांना मानसिक आधार याद्वारे TB चे उच्चाटन हे शक्य आहे.*
*Dr. OMPRAKASH JALAMKAR*
MD Pulmonary Medicine (Mumbai)
DAA, (CMC Vellore)
EDRM (Switzerland)